मुरुडच्या समुद्रकिनारी पॅरासेलिंगचा दोर तुटल्याने मुलाचा मृत्यू, तर वडील गंभीर जखमी
अपघाताबाबत पॅरासेलिंग चालकांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे समुद्र किनाऱ्यावर सुरु असलेल्या खेळांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी मुंबई : मुरुड समुद्रकिनाऱ्याव पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बाप-लेक खाली पडून अपघात झाला. या अपघातात 15 वर्षीय मुलगा वेदांत पवार जागीच ठार झाला असून वडील गणेश पवार गंभीर जखमी झाले आहेत. गणेश पवार यांना मुरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पॅरासेलिंग चालकावर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार, रविवार सुट्टीनिमित्त गणेश पवार हे आपल्या कुटुंबासह पुणे, कसबा रोड येथून मुरुड येथे फिरण्यास आले होते. पवार कुटुंबीय मुरुड समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करीत सुट्टीचा आनंद लुटत होते. मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेल्या पॅरासेलिंग करण्यासाठी पवार बाप-लेक गेले. पॅरासेलिंग उंच झेपावल्यानंतर काही वेळातच दोर तुटल्याने दोघेही वेगाने वरुन खाली कोसळले.
या अपघातात वेदांत जमिनीवर पडल्यानंतर जागीच ठार झाला. तर गणेश पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मुरुड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुग्णलयात पाठविण्यात आला आहे. या अपघाताबाबत पॅरासेलिंग चालकांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे समुद्र किनाऱ्यावर सुरु असलेल्या खेळांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.