Mumbai kalamboli : मृतदेहांची अदलाबदल; कळंबोलीतील प्रकाराने नातेवाईकांना मनस्ताप
Mumbai kalamboli : मुंबईतील कळंबोली येथील एमजीएम रूगाणालयात मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना गोंधळ झालाय. मृतदेहाची आदलाबदल झाल्याने चांगलीच धांदल उडाली आहे.
मुंबई : कळंबोली येथील एमजीएम रूगाणालयात मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना गोंधळ झालाय. मृतदेहाची आदलाबदल झाल्याने चांगलीच धांदल उडाली आहे. दोन्ही मृतांच्या चेहऱ्यामध्ये साम्य असल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अलिबाग येथे पोचलेला मृतदेह परत कळंबोली येथे आणावा लागला असून थोडाफार उशीर झाला असता तर दोन व्यक्तींवर चुकीचे अंत्यसंस्कार झाले असते, अशी माहिती नातेवाईकांनी दिलीय.
अलिबाग येथील पेझारी गावात राहणाऱ्या रमाकांत पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कळंबोली येथील एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाल्याने मंगळवारी दिवसा मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. रात्रभरासाठी रमाकांत पाटील यांचे शव रुग्णालतील शीतगृहात ठेवण्यात आले. याच वेळी शीतगृहात पनवेल तालुक्यातील सोमाटणे येथील राम पाटील यांचा देखील मृतदेह ठेवण्यात आला होता. मंगळवारी सकाळी पेझारी गावचे मयत रमाकांत पाटील
यांचे नातलग शीतगृहातील मृतदेह घेऊन जाण्यासाठी आले असता त्यांना राम पाटील यांना मृतदेह देण्यात आला.
शीतगृहातील कर्मचाऱ्याने दोन्ही मृतांच्या नावाच्या सुरवातीला असलेल्या आर या इंग्रजी अक्षरावरून सोमाटणे येथील राम पाटील यांचा मृतदेह अलिबाग पेझारी येथील रामकांत पाटील यांच्या नातलगांकडे स्वाधीन केला. यावेळी चेहऱ्यात साम्य असल्याने नातेवाईकांच्या देखील ही बाब लक्षात आली नाही आणि ते रामकांत पाटील यांच्या ऐवजी राम पाटील यांचा मृतदेह घरी घेऊन गेले. त्याच वेळी राम पाटील यांचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या नातेवाकांना शीतगृहात असलेला मृतदेह राम यांचा नसल्याचे लक्षात आले.
नातेवाईकांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यानच्या काळात पेझारी येथे घेऊन जाण्यात आलेल्या मृतदेहाच्या अंतिमसंस्कारची तयारी पूर्ण झाली होती. दुखः कोसळल्याने घरात आलेल्या मृतदेहाकडे पाहूण सर्वांनी हंबरडा फोडला होता. बाहेर अंत्यसंस्काराचे सामान आणून अंत्यसंस्काराची तयारी केली जात होती. ऐवढ्यात मृतदेह बदली झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून कॉलद्वारे रमाकांत यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. अजून काही वेळ गेला असता तर चुकीच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाले असते. अखेर परत अलिबाग वरून बदली झालेला मृतदेह कळंबोली येथील एमजीएम रूग्णालयात आणावा लागला.
राम पाटील यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त करून रामचंद्र पाटील यांचा मृतदेह अलिबाग येथे घेवून गेले. दरम्यान या सर्व गोंधळामुळे सकाळी होणारा अंत्यसंस्कार दुपारी करण्याची वेळ आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासनाकडून इन्कार
एमजीएम रुग्णालय प्रशासनाकडून मात्र या प्रकरणाचा इन्कार करण्यात आला आहे. मृतदेह घेवून जाताना रामचंद्र पाटील यांच्या नातेवाईकांनी निट ओळख पटवली नसल्याने मृतदेहाची आदलाबदल झाल्याचे रूग्णालयाने स्पष्ट केले आहे.