(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena Dasara Melava 2022 : शिवाजी पार्क मिळालं नाही तर, कुठे होणार दसरा मेळावा? शिवसेनेचा 'प्लॅन बी' तयार
Shivsena Dasara Melava 2022 : शिवाजी पार्क मिळालं नाही तर शिवसेनेचा प्लॅन बी तयार! महालक्ष्मी, गिरगाव चौपाटी, सेनाभवनसह अनेक पर्याय, आज हायकोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना पत्ते खोलणार!
Shivsena Dasara Melava 2022 : सध्या ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटात (CM Eknath Shinde) दसरा मेळाव्यावरुन जुंपली आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यासाठी दोन्ही गट आग्रही आहे. याप्रकरणी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली असून आज उच्च न्यायालयात शिवसेनेच्या (Shiv Sena) याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता 'प्लान बी' तयार ठेवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
जर दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क उपलब्ध झालं नाही, तर दुसऱ्या मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिवसेनेनं प्लॅन बी तयार ठेवल्याची माहिती एबीपी माझाला सुत्रांनी दिली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स, गिरगाव चौपाटी, शिवसेनाभवनसह काही पर्याय शिवसेनेनं तयार ठेवल्याचं कळतंय. आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय झाल्यानंतरच शिवसेना आपले पत्ते उघडणार असल्याची माहिती मिळत आहे.
दसरा मेळाव्यात शिंदे गटाचं जोरदार शक्तीप्रदर्शन
दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्ष वाढला आहे. दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांनाच मेळाव्यासाठी आणण्याचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती मिळत आहे. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान, याबाबत रणनिती आखण्यात आल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.
महापालिकेचं ठरलं, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणालाच नाही
शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. महापालिकेनं मुंबई पोलिसांकडून दसरा मेळाव्याला कोणाला परवानगी देण्यात यावी, यासंदर्भात अभिप्राय मागवला होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायानुसार, दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचं मुंबई महापालिकेकडून दोन्ही गटांना सांगण्यात आलं आहे. दादर आणि प्रभादेवीमध्ये काही दिवसांपूर्वी शिवसैनिक आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. त्यावेळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यावरुनही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळेच परवानगी नाकरण्यात आल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :