Dasara Melava 2022 : महापालिकेचं ठरलं, शिवाजी पार्क कुणालाच नाही! मनपाचं पत्र माझाच्या हाती, हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष
Dasara Melava 2022 : मुंबई महानगरपालिकेनं शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनाही परवानगी नाकारली आहे.
Dasara Melava 2022 : शिवसेनेतील (Shiv Sena) सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai Municipal Corporation) दोन्ही गटांना दिलेलं पत्र एबीपी माझाच्या (ABP Majha) हाती लागलं आहे. त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला हायकोर्टात होणार आहे. रितसर परवानगी मागूनही महापालिकेनं चालढकल केल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतली आहे. आज त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. महापालिका प्रशासनावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला आता हायकोर्टात होणार आहे. रितसर परवानगी मागूनही महापालिकेनं चालढकल केल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. महापालिका प्रशासनावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, शिवसेनेपाठोपाठ आता शिंदे गटानंही हायकोर्टात धाव घेतली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हायकोर्टात मध्यस्थ याचिका दाखल केली आहे. शिवसेनेची याचिका दिशाभूल करणारी असल्याचा दावा शिंदे गटाकडून याचिकेत करण्यात आला आहे.
...म्हणून महापालिकेनं परवानगी नाकारली
मुंबई महापालिकेनं मुंबई पोलिसांकडून अभिप्राय मागवला होता. दसरा मेळाव्याला कोणाला परवानगी देता येईल? यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून महापालिकेला अभिप्राय देण्यात आला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायानुसार, दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. दादर आणि प्रभादेवीमध्ये काही दिवसांपूर्वी शिवसैनिक आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. त्यावेळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यावरुनही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळेच परवानगी नाकरण्यात आल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल होतात. पण शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिंदे गटाकडून आधी पक्षाचं गटनेते पद, पक्ष, पक्षचिन्ह आणि आता थेट दसरा मेळावा ठाकरेंकडून हायजॅक करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. वांद्र्यांतील मैदानासाठी परवानगी मिळाल्यानंतरही शिंदे गट शिवाजी पार्क मैदानासाठी आग्रही आहे. तर, परवानगी मिळो अथवा ना मिळो, यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज हायकोर्टात होणारी सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आज हायकोर्टात कोणाला दिलासा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.