मुंबईकरांचं आवडतं पेय महागलं, कटिंग चहा आता दहा रुपये
सध्या कोरोनामुळे चहा विक्रीवर अनेक निर्बंध आलेले आहेत. यात प्रामुख्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. यासाठी पर्याय म्हणून कागदी आणि प्लास्टिकचे वापरले जातायेत.
मुंबई : मुंबईच्या कोपऱ्या-कोपऱ्यावर मिळणाऱ्या वाफाळणाऱ्या चहाचा दर आता वाढलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून टी अँड कॉफी असोसिएशन'ने कटिंग चहाचा दर 7 रुपयावरून दहा रुपये केलेला आहे.
आपल्या कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि कामात अधिक गती वाढवण्यासाठी मुंबईकर थकल्यानंतर गरम-गरम चहाला प्राधान्य देतात. मुंबईतल्या कोपऱ्या-कोपऱ्यावर तसेच कार्यालयांच्या कोपऱ्यांवर सुद्धा त्यामुळेच अनेक चहाचे ठेले आपल्याला दिसून येतात. चहा जणू मुंबईकरांचा आवडते पेय आहे. मात्र सध्या कोरोनामुळे चहा विक्रेत्यांनी त्यांच्याकडे असणारे काचेचे ग्लास वापरण्यास बंद केलेले आहेत. कोरोनाचा याचा प्रसार होऊ नये यासाठी टी अँड कॉफी असोसिएशन' ने प्रत्येक चहाच्या ठेल्यावर थोडे बदल केले आहेत. या बदलांमुळे सध्या सात ते आठ रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता मुंबईकरांना दहा रुपयाला मिळणार आहे.
कोरोनामुळे संपूर्ण उद्योग धंदे बंद झाले होते. त्यामुळे चहा विक्रेते देखील गेल्या पाच महिन्यांपासून अडचणीत आलेले आहेत. पूर्वीसारखा चहाचा व्यवसाय सुरू करायचा तर अनेक नियमांना सामोरं जावं लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक चहाच्या दुकानात कागदी कप, सॅनिटायझर, मास्क, नेहमीपेक्षा जास्त स्वच्छता, सोशल डिस्टंन्सिंग आधिसूचनाचे पालन करावे लागत आहे. त्याचबरोबर चहा पावडर, साखर यांचे भाव वाढल्यामुळे मुंबईतील 5000 चहा विक्रेत्यांनी चहाच्या दरांमध्ये 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचे स्वागत सामान्य चहा पिणाऱ्यांनी केलेलं आहे.
मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लोक वेगवेगळ्या कामानिमित्ताने बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईकरांनी मुंबईच्या रस्त्यांवर मिळणाऱ्या वाफाळणारा चहाला नक्कीच मिस केलं असणार. पण आता याच चहाचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकरांना आता आपल्या खिशातून अधिकचे दोन रुपये द्यावे लागणार. पण स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी मुंबईकरांनी देखील टी अँड कॉफी असोसिएशनच्या निर्णयाला संमती दिली आहे. त्यामुळे यापुढेही मुंबईतील चहाची रंगत अधिकच वाढणार आहे यात शंका नाही.
चहा हे मुंबईकरांचं आवडतं पेय आहे. दिवसातून किमान तीन ते चार वेळा मुंबईकर चहा पिणे पसंत करतात. दर्जेदार चहा मुंबईकरांना देता यावा यासाठी टी अँड कॉफी असोसिएशनचा नेहमीच प्रयत्न असतो. सध्या कोरोनामुळे चहा विक्रीवर अनेक निर्बंध आलेले आहेत. यात प्रामुख्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. यासाठी पर्याय म्हणून कागदी आणि प्लास्टिकचे वापरले जातायेत. चहा विक्रेते त्याच्या हाताना सॅनिटायझरचा वापर करत आहे. चहा शौकिनांच्या सुरक्षेसाठी अधिक काळजी घेतली जात आहे. त्यामुळे आम्ही दोन रुपयांची वाढ करत आहोत आणि याला मुंबईकर चांगला प्रतिसाद देतील असा आम्हाला विश्वास वाटतो, असं टी अँड कॉफी असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी सांगितलं.