![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
सरकारचा मोठा निर्णय! राज्यात आजपासून संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आजपासून संचारबंदी जाहीर केली आहे. सोबतच जिल्ह्यांच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या आहेत.
![सरकारचा मोठा निर्णय! राज्यात आजपासून संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा curfew in maharashtra cm uddhav thackeray due to coronavirus सरकारचा मोठा निर्णय! राज्यात आजपासून संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/23173459/Sancharbandi_WEB.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात कोरोना विषाणू जास्त पसरू नये म्हणून जिल्ह्याजिल्ह्यातील सीमाही बंद करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरुच राहणार आहेत.
राज्यातील नागरिकांना संबोधित करताना जनता कर्फ्यूला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांचे आभार मानले. मात्र, टाळ्या किंवा थाळीनाद केल्याने कोरोना जातो हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. अत्यावश्यक सेवांमध्ये अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आपण हे केल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात संचारबंदी कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे, मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. काल राज्यात 144 कलम लावले होते. आता मला राज्यात संचार बंदी लावावी लागते आहे. खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या. आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली. देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे.
जीवनावश्यक गोष्टी सुरू राहणार जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने-आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील. खुपदा विनंती करूनही पालन होत नसल्याने मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे. सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील. दरम्यान, प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत. सर्व माध्यमांना देखील मी धन्यवाद देतो. कोरोनाविषयी आपण चांगली जनजागृती करीत आहात. ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे. घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत. ही कठोर पाउले केवळ जनतेच्या हितासाठी असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
Punjab Curfew | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये संचारबंदी, लॉकडाऊननंतरही सूचना न पाळल्याने निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)