मुंबईत खासगी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रे 24 तास सुरु ठेवणार, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मुंबईमधील खासगी रुग्णालयांना आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे 24 तास (24 x 7) लसीकरण सुरु ठेवण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावास केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना अधिकाधिक कठोर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढविण्याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात एका विशेष आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुंबईमधील खासगी रुग्णालयांना आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे 24 तास (24 x 7) लसीकरण सुरु ठेवण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.
या बैठकी दरम्यान लसीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
1. वय-वर्षे 60 पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे लसीकरण सध्या करण्यात येत आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 9 मार्टपर्यंत पर्यंत 1 लाख 36 हजार 491 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच वय-वर्षे 45 ते 59 या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंचेही लसीकरण करण्यात येत आहे
2. दोन्ही वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी 1 जानेवारी 2022 चे वय लक्षात घ्यावयाचे आहे. यानुसार आज ज्यांचे वय 59 वर्षे 3 महिने किंवा सहव्याधी असणा-या गटातील व्यक्तींचे वय 44 वर्षे 3 महिने असले, तरी देखील त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे. ही बाब महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान आवर्जून नमूद केली.
3. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन मुंबईमधील खासगी रुग्णालयांना आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे 24 तास (24 x 7) लसीकरण सुरु ठेवण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावास केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यानुसार केंद्र शासनाच्या संबंधित संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्याची विनंती महापालिकेने केंद्र शासनाकडे केली आहे. याबाबत देखील आजच्या बैठकी दरम्यान चर्चा झाली. केंद्र शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार मुंबईतील रुग्णालयांनी आठवड्याचे सातही दिवस 24 तास सुरु राहणारी लसीकरण केंद्रे सुरु करावीत, असे आवाहन महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान केले. तर अनेक खासगी रुग्णालयांनी 24 तास कार्यरत राहणारे लसीकरण केंद्र सुरु करण्यात स्वारस्य दाखवले.
4. 24 तास कार्यरत राहणारी लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण संख्या सुनियोजित पद्धतीने वाढविण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेता, अशा प्रकारची लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर दररोज 1 लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचा मानस महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान नमूद केला. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही सुमारे 30 लाख आहे, ही बाब लक्षात घेतल्यास व दिवसाला 1 लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास साधारणपणे महिन्याभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले असेल. कोविडचा धोका ज्येष्ठ नागरिकांना अधिक असतो. त्यामुळे अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत असल्याचेही महापालिका आयुक्तांनी नमूद केले.
5. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सध्या सुरु असणारी लसीकरण केंद्रे ही 8 ते 12 तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. या लसीकरण केंद्राद्वारे 9 मार्चला 38 हजार 266 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. ही लसीकरण केंद्रे 24 तास कार्यरत झाल्यास दिवसाला 1 लाख व्यक्तींचे लसीकरण करणे सहज शक्य होईल, असा विश्वास महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान व्यक्त केला. त्याचबरोबर आणखी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
6. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्तींचे लसीकरण करण्यापूर्वी त्यांची नोंदणी ही कोविन अॅपवर होणे गरजेचे आहे. तसेच यासाठी रुग्णालयांमध्ये जाऊन थेट नोंदणीचा पर्याय देखील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. रुग्णालयांच्या स्तरावर संबंधित संकेतस्थळाद्वारे नोंदणी करण्यात अडचणी असल्याची बाब काही खासगी रुग्णालयांद्वारे आजच्या बैठकी दरम्यान मांडण्यात आली.
7. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या रुग्णालयांना लसीकरण केंद्रे सुरु करण्यास यापूर्वीच केंद्र शासनाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. परंतु, ज्यांनी अद्यापही लसीकरण केंद्र सुरु केले नाही, अशा रुग्णालयातील लसीकरण केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी माहितीही आजच्या बैठकी दरम्यान देण्यात आली.
8. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड बाधित रुग्णांची संख्या सध्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज असून संभाव्य गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व 24 विभागांच्या स्तरावर आवश्यक ते सर्व नियोजन सुव्यवस्थित प्रकारे करण्यात आले आहे. हे नियोजन करताना रुग्णालये, आय. सी. यू. खाटा, ऑक्सिजन खाटा, रुग्णवाहिका, मनुष्यबळ, औषधोपचार विषयक सामुग्री इत्यादी सर्व संबंधित बाबींचेही सूक्ष्मस्तरीय नियोजन देखील यापूर्वीच करण्यात आले आहे.