Reliance on Employees : रिलायन्स उद्योगसमूहाचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना पाच वर्षे पगार मिळणार
रिलायन्स उद्योग समूह कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पुढील पाच वर्षे त्याचं नियमित वेतन अदा करणार आहे. एवढंच नाही तर मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्याचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार आहे.
![Reliance on Employees : रिलायन्स उद्योगसमूहाचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना पाच वर्षे पगार मिळणार Covid-19 pandemic Reliance Industries to offer full salary for 5 years to family of deceased employees, education for children Reliance on Employees : रिलायन्स उद्योगसमूहाचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना पाच वर्षे पगार मिळणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/03/ef90170eae6857ce37d402ab5a40f56d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाने Reliance Industries (RIL) कोरोनामुळे मृत झालेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पुढील पाच वर्षे त्याचा पगार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च रिलायन्स उद्योग समूहाकडून केला जाणार आहे.
देशात कोरोना व्हायरसच्या महामारीने थैमान घातलं आहे. त्यात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. मात्र देशातील प्रमुख उद्योगस समूह असलेल्या रिलायन्सने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिलायन्सने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रिलायन्स उद्योग समूह कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पुढील पाच वर्षे त्याचं नियमित वेतन अदा करणार आहे. एवढंच नाही तर मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्याचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार आहे.
रिलायन्स उद्योगसमूहासाठी त्यांचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब सर्वाधिक महत्त्वाचं असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रिलायन्स उद्योग समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्स फॅमिली सपोर्ट अँड वेलफेअर स्कीम (Reliance Family Support and Welfare scheme) ची घोषणा केली आहे. या प्रसिद्धीपत्रकात रिलायन्सच्या मुकेश आणि निता अंबानी यांनी म्हटलंय की, "कोरोना व्हायरसचा आतंक आजवरच्या ज्ञात इतिहासातील सर्वात भीषण आहे. या महामारीमुळे देश एका अत्यंत भीषण स्थितीतून जात आहे. आपल्या समूहापैकी तसंच देशातील अनेकजण या आजाराचा सामना करत आहेत. अशा स्थितीत रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या पूर्ण क्षमतेसह आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयासोबत उभी आहे. या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना रिलायन्स उद्योगसमूह सर्व आवश्यक मदत करणार आहे."
रिलायन्स फॅमिली सपोर्ट स्कीममधून कोणकोणत्या प्रकारची मदत मिळेल?
रिलायन्स उद्योग समूहाच्या घोषणेनुसार,
1. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पुढील पाच वर्षे कर्मचाऱ्याचा पगार मिळत राहील
2. पीडित परिवाराला एकरकमी रुपये 10 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल
3. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च रिलायन्स इंडस्ट्रीजकडून केला जाईल
4. मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांना देशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाल्यावर, त्या अभ्यासक्रमाचं शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क आणि पाठ्यपुस्तकाचा खर्च यासाठी येणारा पूर्ण खर्च रिलायन्सकडून पुरवला जाईल.
5. मुलाचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत, पती-पत्नी, आई-वडील मुलं यांचा सर्व प्रकारचा वैद्यकीय खर्च कंपनीकडून केला जाईल
6. सध्या जे कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी कोरोनाबाधित आहे, ते शारीरिक मानसिकदृष्ट्या ठीक होईपर्यंत कोविड 19 रजा घेऊ शकतात
7. जे कर्मचारी रिलायन्स उद्योग समूहासाठी काम करतात, मात्र कंपनीच्या पे रोलवर नाहीत, त्यांचं कोरोनामुळे निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना एकरकमी दहा लाख रुपयांची मदत मिळेल.
रिलायन्स उद्योग समूहाच्या फॅमिली सपोर्ट स्कीममध्ये या सोबतच प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला कोरोना प्रतिबंधक लस रिलायन्स उद्योग समूहाकडून मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)