Coronavirus Vaccine update : मुंबईत जम्बो लसीकरण केंद्र, दिवसाला 50 हजार लोकांना लस देण्याची व्यवस्था
कोरोना काळात उभारलेल्या मुंबईतील जम्बो कोविड सेंटरचं रुपांतर जम्बो लसीकरण केंद्रात होणार आहे. मुंबईत एकूण 100 लसीकरण केंद्रांची तयारी करणार असून एका दिवसात 50 हजार लेकांना लस टोचण्याची व्यवस्था होईल.
मुंबई : कोरोना काळात उभारलेल्या मुंबईतील जम्बो कोविड सेंटरचं रुपांतर जम्बो लसीकरण केंद्रात होणार आहे. बीकेसी, नेस्को, दहिसर, मुलुंड, एनएससीआय या ठिकाणी ही जम्बो लसीकरण केंद्रे असतील. कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्र यांतील लोकांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल. जम्बो कोविड सेंटरच्या मोकळ्या जागेत ही लसीकरण केंद्रे असतील. रुग्णसंख्या कमी होत असल्यानं आता जम्बो कोविड सेंटर्समध्ये फारसे रुग्ण नाहीत. त्यामुळे, त्यांचा लसीकरण केंद्रांसाठी वापर केला जाईल. मुंबईत एकूण 100 लसीकरण केंद्रांची तयारी करणार असून एका दिवसात 50 हजार लेकांना लस टोचण्याची व्यवस्था होईल. प्रत्येक वॉर्ड मध्ये किमान 5 लसीकरण केंद्रे असतील अशी तयारी सध्या सुरु आहे, अशी माहिती अतिरीक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे.
Corona UK Strain : महाराष्ट्रात नवीन कोरोनाचे रुग्ण! मुख्यमंत्री केंद्राला करणार 'ही' विनंती
मुंबई पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी सज्ज झाली आहे. कोरोनावरील लस आल्यानंतर अवघ्या 24 तासांत प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत पहिल्या टप्प्यातील 8 केंद्रांचा आणि कोल्ड स्टोरेजचा आज महापालिका अतिरीक्त आयुक्तांकडून आढावा घेतला गेला. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यासाठीचीही तयारी सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी फ्रंट लाईन वर्कर्सचं डेटा अपलोडिंग सुरु असल्याची माहिती आहे.
मुंबईमध्ये लसीकरणासाठी मुंबईत 500 पथकं तयार केली असून 5000 चा स्टाफ तयार ठेवणार आहेत. दोन ते तीन शिफ्टमध्ये लसीकरणासाठीचा हे कर्मचारी काम करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 8 केंद्र तयार झाली असून आणखी 8 केंद्र राखीव ठेवणार आहेत. ही राखीव केंद्र गरज पडल्यास वापरणार आहेत. सायन, केईएम, कुपर, नायर या मेडिकल कॉलेज मध्ये प्रत्येकी 10 युनिट तयार करणार आहेत. तर राजावाडी, कुर्ला भाभा, बांग्रा भाभा, व्हि.एन. देसाई या हॉस्पिटल्समध्ये 5 युनिट तयार करणार आहेत, अशी माहिती आहे.
एका युनिट मार्फत 100 लोकांना लस दिली जाईल. दोन शिफ्टमध्ये काम करुन एका दिवसांत 1000 लोकांना लस दिली जाण्याचं लक्ष्य आहे. मोठे लसीकरण केंद्र असल्यास एका दिवसात 2000 लोकांना लस दिली जाईल. कोल्ड स्टोरेज प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये असेल. तसेच, एफ साऊथ वॉर्ड आणि कांजुरमार्गच्या आरोग्य केंद्रात कोल्ड स्टोरेज असेल. लस साठवण्यासाठी मुंबईत 17 ILR आहेत. प्रत्येक ILR मध्ये 62 हजार लसीचे व्हायल्स साठवले जाऊ शकतात. मुंबईत आज 10 लाख व्हायल्स एका वेळी साठवण्याची क्षमता आहे.
Corona Vaccine Dry Run: मुंबई पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी सज्ज, ड्राय रनचीही गरज नाही!