कोरोना टेस्टिंगचा फार्स अन सील झालेलं घर, दिग्दर्शक-निर्माते विरेंद्र प्रधान यांनी पत्राद्वारे व्यक्त केली उद्विग्नता
दिग्दर्शक-निर्माते विरेंद्र प्रधान यांना दोन दिवसांपूर्वी जो अनुभव आला त्यातून उद्विग्न होऊन मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांना त्यांनी एक पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : दिग्दर्शक-निर्माते विरेंद्र प्रधान हे नाव आपल्याला नवं नाही. टीव्ही इंडस्ट्रीत अनेक मोठ्या मालिका त्यांनी दिल्या आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो राधा ही बावरी, उंच माझा झोका, या सुखांनो या, स्वामिनी यांचा. प्रधान यांना दोन दिवसांपूर्वी जो अनुभव आला त्यातून उद्विग्न होऊन मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांना त्यांनी एक पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका चुकीच्या आरटीपीसीआर रिपोर्टमुळे झालेला नाहक मनस्ताप त्यांनी यात कथन केला आहे.
विरेंद्र आणि ऋग्वेदी हे प्रधान दाम्पत्य दमण इथे चित्रिकरणाला जाणार होतं. म्हणून त्यांनी प्रवासाआधी आपआपल्या आरटीपीसीआर टेस्ट करायच्या ठरवल्या. त्यानुसार त्यांनी गोरेगावातल्या एका लॅबमध्ये टेस्ट केल्या. त्यात विरेद्र निगेटिव्ह आले तर ऋग्वेदी पॉझिटिव्ह आल्या. पण ऋग्वेदी यांना काहीच लक्षणे नव्हती. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुन्हा एकदा दादरच्या दुसऱ्या लॅबमधून दोघांची टेस्ट करवली. तर त्यात दोघेही निगेटिव्ह आले. पण पहिला पॉझिटिव आलेल्या अहवालाने मात्र अनेक गोंधळ निर्माण केले. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांमुळे यात भर पडल्याचं प्रधान सांगतात. त्यांनी आयुक्तांना लिहिलेलं पत्र असं..
सुरेश ककाणी साहेब
सप्रेम नमस्कार.
सर. तिसरा रिपोर्ट ही निगेटिव्ह. या 3 दिवसात आमचं संपूर्ण कुटुंब यात ढवळून निघालय. माझी 77 वर्षांची आई, माझे 82 वर्षांचे काका , 9 वर्षांचा माझा सतत आई म्हणून टाहो फोडणारा मुलगा, मला पोलीस स्टेशनमधून तुमच्या वर FIR दाखल करू, अजिबात समंजसपणा न दाखवता दमात घेणारे डॉक्टर ठाकूर, अत्यंत धावपळीत या डॉक्टर ठाकूर यांनी दम दिल्याचे पत्र पाठवून आमच्या सोसायटीला ताबडतोप माझा फ्लॅट सिल करायला लावणे, आमच्या फॅमिली डॉक्टर यांना दमात घेणे वगैरे वगैरे गोष्टींनी जीव तुटला.
पहिल्या लॅबच्या चुकीची आपण चौकशी करू, काळजी करू नका वगैरे मायेचे शब्द आम्ही काय फक्त आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडूनच अपेक्षित ठेवावे का ? माननीय मुख्यमंत्री जेव्हा बोलतात तेव्हा ते आम्हाला आमच्या कुटुंबाचे सदस्य वाटतात. त्यांच्यावर ताण नाहीये का? तुमच्यावर ताण नाहीये का? आणि एका वॉर्डच काम पाहून अत्यंत ताण आलेले आणि अजिबात सामंजस्य न दाखवता दबाव टाकणारे डॉक्टर ठाकूर पाहून आश्चर्य वाटले आणि वाईटही वाटले. सर गेल्या दीड वर्षात, माझ्याकडून जे काही करणे शक्य होईल ते मी समाजासाठी केले आहे आणि या पुढेही करेन. सामाजिक भान ठेऊन जगणारी आम्ही सर्व सामान्य माणसे आहोत. पण अशा प्रसंगी आम्ही कोणाकडे जायचे? तुम्हाला त्रास द्यायला किंवा मुख्यमंत्री साहेबांना त्रास द्यायला नक्कीच आवडणार नाही पण माझा हा प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपातील आहे. काका, मामा, भाऊ, दादा उपयोगी पडत नसतील तर धावत वडिलांकडेच यावे लागते. तसा तुमच्याकडे आलो आहे.
माझा प्रश्न वैयक्तिक नाही. मी समजू शकतो सर की सगळेच ताणग्रस्त आणि चाचपडत आहेत. जग ग्रासले गेले आहे. पण अशावेळी आपण काही लोकांनी तरी मनाचा मोठेपणा दाखवायला नको का ? ही जबाबदारी काय फक्त आपल्या सारख्या विभुतीनी किंवा माननीय मुख्यमंत्री यांनीच घ्यावी का? 14 दिवस घरी राहण्याची अडचण नाही. जनता ही गोष्ट गेले वर्षभर करतेच आहे. पण माझ्या पत्नीला पॉझिटिव्ह घोषित करून तिच्यावर औषधांचा भडिमार केला गेला असता, ती निगेटिव्ह असताना आणि त्यातून पुढे काही बरे वाईट झाले असते तर काय करायला हवे होते ? आम्हाला वैद्यकीय शास्त्र समजत नाही. त्या साठी डॉक्टर नावाचे देवदूत उदंड काम करत आहेत पण एका चुकीच्या व्यक्तीने एका कुटुंबाला जर त्रास होत असेल तर तो टप्प्याटप्प्याने पूर्ण समाजाला होऊ शकतो. याची खबरदारी आपण घ्यायला नको का ? माझे या 4 दिवसात जे कामाचे नुकसान झाले, आमच्या सोसायटीमधले लोकं संशयाने पाहू बोलू लागले आणि या डॉक्टर ठाकूर यांना 4 जास्तीचे शब्द ऐकायला बोलायला ही त्रास होत असेल तर आम्ही सामान्य मुंबईकरांनी कुठे जायचे ?
सर कोणाबद्दल तक्रार नाही. डॉक्टर ठाकूर त्याची फक्त जबाबदारी आणि ती ही कोणीतरी लिहून दिलेली पार पाडत आहेत. प्रोटोकॉल म्हणत होते ते या जबाबदारीला. हा प्रोटोकॉल लोकांना सांभाळण्यासाठी आहे की दमबाजी करण्यासाठी?
सर, मी हे सगळ प्रातिनिधिक स्वरूपात बोलतोय कारण अशा गोष्टी खूप ठिकाणी घडतायंत. आपणच यातून मार्ग काढू शकता आणि लोकांना मार्ग दाखवू शकता. पहिल्या लॅबच्या रिपोर्टचं काय किंवा त्या लॅबचं काय करायचं हे तुम्ही पहालच. पण आता तरी मी माझ्या अडकलेल्या कुटुंबाला यातून बाहेर काढू शकतो का आणि माझे काम सुरू करून आपल्या आर्थिक चक्राला गती देण्याचा प्रयत्न करू शकतो का हे कळवावे. सगळी खबरदारी काळजी आम्ही घेऊ आणि कायम घेऊ. सरकार आणि यंत्रणा याबद्दल जबरदस्त विश्वास आहे आणि तो कायम राहील.
जय महाराष्ट्र !
आपला नम्र
विरेंद्र प्रधान
घडल्या प्रकाराची सगळी सविस्तर माहीती त्यांनी एबीपी माझालाही दिली. टेस्ट रिपोर्ट चुकीचा येणे हे तर गंभीर आहेच. पण तो मुळात निगेटिव्ह असलेल्या इसमाला जर कोव्हिडचे हेवी डेस दिले गेले असते तर त्यातून काही तब्येतीच्या तक्रारी उद्भवल्या असत्या तर जबाबदार कोण असा प्रश्न ते विचारतात. शिवाय, पालिकेत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या उर्मट वर्तनाबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "रिपोर्ट चुकीचा आल्यानंतर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी, सभ्यपणे, आपण याची चौकशी करू, पण तोवर तुम्ही तीन दिवस घरीच आराम करा असं सांगितलं असतं तर आम्ही खुशाल ते मान्य केलं असतं. पण या महाशयांनी पोलिसांना सांगून आमच घर सील करवलं. आमच्या सोसायटीला दम भरला. हे भयानक आहे. तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर आता त्यांनी हे सील काढलं आहे आणि आम्हाला प्रवासाला परवानगी दिली आहे. पण दोन दिवस जो झाला तो मनस्ताप भयंकर होता." आज निदान मिडीयात माझी ओळख आहे म्हणून मी हे बोलू शकलो, इतर सामान्य माणसानं यावेळी काय करायचं असा प्रश्नही त्यांनी विचारला.
महत्वाच्या बातम्या :