Corona Vaccination : मुंबईत आज लसीकरण बंद राहणार; लस साठा उपलब्ध नसल्याने प्रशासनाचा निर्णय
पुरेसा लस साठा उपलब्ध झाल्यानंतर मुंबईतील लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई : मुंबईकरानो, आज सकाळी लवकर उठून पटापट आवरुन लस घेण्यासाठी जाणार असाल तर, जरा थांबा. उगाच निराशा करुन घेऊ नका. कारण आज मुंबईत लसीकरण बंद असणार आहे. पुरेशा लस साठ्याअभावी उद्या म्हणजेच 1 जुलै रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.
कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज बंद राहणार आहे. लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने माहिती दिली जाईल. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईच नाही तर अनेक ठिकाण लसीच्या पुरेशा साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. कल्याण-डोंबिवलीत तर सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण 25 लसीकरण केंद्रे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून लसींचा साठा पुरेशा प्रमाणात प्राप्त होत नसल्याने आठवड्यातून सरासरी दोन दिवस ही केंद्र बंद असतात. गेल्या आठवडाभरापासून लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने मंगळवार, बुधवार पालिकेची 25 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. कालही साठा प्राप्त न झाल्याने आज म्हणजेच गुरुवारी देखील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.
मुंबईत बुधवारी 692 रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 692 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 96 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8351 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 716 दिवसांवर गेला आहे.