सरकारसाठी कोरोना हाच मुख्य मुद्दा, बदनामीसाठी काहींनी कंगना-सुशांतचा मुद्दा आणला : गुलाबराव पाटील
सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देतंय, शिवभोजन देतंय. त्यामुळेच कंगनाच्या मुद्द्याचं पिल्लू सोडलं आहे. हा सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. तसंच मराठवाड्यासाठी 25 हजार कोटींचा प्लॅन केला असून येत्या चार वर्षात तिथली पाणीटंचाई संपेल असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई : सरकारसाठी कोरोना हाच प्रश्न महत्त्वाचा आहे, काही लोकांनी सरकारची बदनामी करण्यासाठी कंगना-सुशांतचा मुद्दा समोर आणला, असं शिवसेनेचे फायरब्रॅण्ड नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. तसंच मराठवाड्यासाठी 25 हजार कोटींचा प्लॅन तयार केला असून येत्या चार वर्षात तिथे पाणीटंचाई राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
सरकारला, मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारसाठी कोरोना हाच प्रमुख प्रश्न आहे. काही लोकांनी कंगनाचा मुद्दा समोर आणलाय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, शिवभोजन देतोय हे त्यांच्याकडून पाहवत नाही. त्यामुळेच कंगनाच्या मुद्द्याचं पिल्लू सोडलं आहे. हा सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. कोरोनावर काम सुरु असताना कंगनाचा मुद्दा कोणी पुढे आणला हे आधी शोधा. शिवसेना, उद्धव ठाकरे, मुंबईला बदनाम करण्याचा डाव आहे. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव आहे.
...तर भाजपला सलाम करेन आम्हाला ना कंगनाशी देणं घेणं आहे ना सुशांतशी. कंगनाचा प्रश्न कोणीतरी मुद्दाम समोर आणला. दीड लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांची कधीची सीआयडी, सीबीआय चौकशी झाली नाही. शेतकरी आत्महत्येबाबत भाजपने कधी प्रश्न विचारला नाही. सुशांत सिंह आणि कंगना महत्त्वाचे वाटले, का तर ते हिरो-हिरोईनआहेत म्हणून? शेतकरी आत्महत्येबाबत प्रश्न उचलले असते तर मी भाजपला सलाम केला असता. पण यांना बिहार निवडणुकीसाठी भांडवल करायचं आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह बोलत असाल तर काय शांत बसायचं का? गालावर माशी बसली तर प्रतिक्रिया आलीच पाहिजे. सैनिकांबाबत आक्षेपार्ह बोलतात त्यावर कोणी बोलत नाही आणि अशाप्रकारच्या कमेंट केल्या तर आम्ही सहन करायचं का? आम्ही सगळं सहन करण्यासाठी जन्माला आलोय का? असे प्रश्नही गुलाबराव पाटील यांनी विचारला.
मराठवाड्यात येत्या चार वर्षात पाणीटंचाई राहणार नाही मराठवाड्यासाठी 25 हजार कोटींचा प्लॅन तयार केल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. "सुरुवातीला उस्मानाबाद, लातूर आणि पैठणमधील गावांची कामं सुरु करणार आहोत. जेणेकरुन येत्या चार वर्षात मराठवाड्यात पाणीटंचाई राहणार नाही. नळजोडणी योजनेचं काम उत्सव म्हणून करावं लागणार आहे," असं ते म्हणाले.
तसंच जनतेला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "90 टक्के आजार दूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे जोपर्यंत जनतेला शुद्ध पाणी देत नाही तोपर्यंत आपण पुढचं काम करु शकत नाही."