मोबाईलमधल्या अॅपवरुन अवघ्या 30 सेकंदात होऊ शकतं कोरोनाचं निदान
आता मोबाईलमधल्या अॅपवरुन कोरोनाचं निदान होणार आहे. अॅपद्वारे होणाऱ्या आवाज चाचणीचा प्रायोगिक टप्पा मुंबईत लवकरच सुरु होणार आहे.
मुंबई : येत्या काळात तुम्ही कोरोनाबाधित आहात की नाही हे तुमच्या हातातल्या मोबाईलवरुन तुम्हांला अवघ्या 30 सेकंदात समजू शकणार आहे. येत्या काळात कुठेही जाताना सॅनिटायझर, मास्क सोबतच मोबाईलमधील एक अॅप देखील तुम्हाला कोरोनापासून सुरक्षित ठेऊ शकेल.
स्वॅब टेस्ट, अँटीजेन आणि अँटीबॉडी तपासणीनंतर आता रुग्णाच्या ध्वनी लहरींवरुन कोरोनाच निदान होण्याची शक्यता आहे. ध्वनी लहरींवरुन (आवाजावरुन) कोरोना पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे निदान केले जाऊ शकते. यासाठी, इस्रायलच्या कंपनीने तयार केलेल्या अॅप आणि सर्व्हरच्या माध्यमातून ही टेस्ट होऊ शकते.
हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन काही ठरावीक सेकंदापर्यंत वोकल टेस्ट दिली जाईल. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन सिव्हीयर, मिडीयम आणि लो रिस्क अश्या तीन वर्गात त्याचा निकाल सांगितला जाईल. या तंत्राला वोकल बायोमार्कर टेस्ट असं म्हटलं जातं. सध्या मुंबईत या तंत्राच्या प्रायोगिक चाचणीसाठी एथिक कमिटीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. त्यानंतर, पुढच्या आठवड्यापासून नेस्कोच्या जंबो केअर सेंटरमधिल संशयित आणि कोविड -19 रूग्णांच्या आवाजाची तपासणी केली जाईल.
30 सेकंदात निदान होणार
या चाचणीमुळे 30 मिनिटांत व्हायरस व्यक्तीच्या शरीरात आहे की नाही याचे निदान होऊ शकेल. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन कूपर हॉस्पिटलच्या सहकार्याने 2000 व्यक्तींवर अभ्यास केला जाईल. इस्त्रायलच्या कंपनीनं तयार केलेल्या एका टॅबद्वारे दोन टप्प्यात ही चाचणी घेतली जाऊ शकते. इस्त्रायलमध्ये 80% रुग्णांमध्ये ही चाचणी यशस्वी झाली आहे. ही संकल्पना नवीन असली तरी अमेरिका आणि इस्त्राईल सारख्या अनेक देशांमध्ये याचा वापर होत आहे.
आवाजाद्वारे कोरोनाचं निदान
जेव्हा कोविड-19 ची लक्षणे दिसू लागतात तेव्हा त्या व्यक्तीस श्वासोच्छवासाची समस्या उद्भवू लागते. ज्यामुळे, त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. या सर्व प्रक्रियेत फुप्फुसाच्या स्नायूंवर ही परिणाम होऊन त्यांना सूज येते. त्याचा परिणाम आवाजावर होऊन तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तो बदल जाणवू लागतो. याच बदललेल्या आवाजाला मोजण्यात येतं आणि त्यातून त्या व्यक्तीला कोविड 19 झाला आहे की नाही याचे निदान होते. नेस्को सेंटर येथील अधिष्ठाता असलेल्या डॉ. नीलम अन्ड्राडे यांच्या म्हणण्यानुसार भविष्यकाळात मॉल्स, शाळा, कॉलेज, ऑफिसेस, थिएटर या सर्व ठिकाणी कोरोनाची आवाजी चाचणी करणारे हे अॅप उपयुक्त ठरु शकते. मात्र, हे तंत्र स्विकारण्यापूर्वी त्याची संपूर्ण शहानिशा करणं गरजेचं आहे.
Covid-19 Test | कोरोना झाला की नाही हे आता आवाजावरुन समजणार?