काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; भाई जगतापांविरोधात झिशान सिद्धिकीची हायकमांडकडे तक्रार
Congress MLA Zeeshan Siddique against Bhai Jagtap मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मुंबई काँग्रेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
Zeeshan Siddique Bhai Jagtap : मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चा दरम्यान भाई जगताप यांनी धक्काबुक्की केली असल्याचे सांगत आणखी धक्कादायक आरोप आमदार सुद्धिकी यांनी केले आहे. या पत्रामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे.
मुंबई काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारविरोधात आक्रोश मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चादरम्यानच भाई जगताप आणि झिशान सिद्धिकी यांच्यातील वाद दिसून आला होता. आमदार झिशान सिद्धिकी यांनी भाई जगताप यांनी आपल्याला वाईट वागणूक देत धक्काबुक्की केली. त्याशिवाय, त्यांनी माझ्या बद्दल आणि समुदायाबाबत अपमानजनक शब्दांचा वापर केला असल्याचा आरोप झिशान सिद्धिकी यांनी केला. भाई जगताप यांच्या वर्तवणुकीमुळे कार्यकर्ते संतापले होते. भाई जगताप यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी झिशान सिद्धिकी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांनी आज निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व इतर काँग्रेस नेत्यांसह आमदार झिशान सिद्धिकीदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांना पत्राबाबत विचारले असता, मला जे म्हणायचे होते, ते पत्र लिहून सोनिया गांधी यांना कळवलं असल्याचं झिशान सिद्धिकी यांनी म्हटले. सोनिया गांधी आमच्या नेत्या असून त्यावर निर्णय घेतील असे म्हटले. आता वादावर आपल्याला काही बोलायचे नसून काँग्रेसमध्ये प्रत्येकाला म्हणणं मांडण्याचा अधिकार असल्याचेही सिद्धिकी यांनी म्हटले.
झिशान सिद्धिकी यांनी याआधीदेखील भाई जगताप यांच्याविरोधात तक्रार केली होती. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून भाई जगताप यांनी आपल्याविरोधात कारवाई केल्याचे झिशान यांनी म्हटले होते.
नाना पटोले म्हणतात, काँग्रेसमध्ये वाद नाही
काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. काही प्रमाणात काही झालं असेल तर त्याला एवढी प्रसिद्धी द्यायची गरज नाही असेही पटोले यांनी म्हटले. आमदार झिशान सिद्धिकी माध्यमांसमोर येत असताना नाना पटोले यांनी त्यांना बाजूला घेऊन गेले आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.