मुंबईतील ग्रँटरोडमध्ये पाण्याच्या टाकीत उतरलेल्या कर्मचाऱ्याचा गुदमरुन मृ्त्यू, चौघांवर उपचार सुरु
मुंबई महापालिकेच्या भायखळा जल विभागाचे पाच कर्मचारी टाकीत उतरले होते. मात्र अवघ्या काही मिनिटातच आतील विषारी वायूमुळे कर्मचाऱ्यांचा जीव गुदमरु लागला.
मुंबई : ग्रँटरोडमध्ये वॉटर चेंबरमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी उतरलेल्या एका कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर चार कामगारांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली.
ग्रँटरोडमधील नानाचौकातील एका वॉटर चेंबरमध्ये गटारातील खराब पाणी जमा झाले होते. हे खराब पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावण्यात आले होते. मुंबई महापालिकेच्या भायखळा जल विभागाचे पाच कर्मचारी टाकीत उतरले होते. मात्र अवघ्या काही मिनिटातच आतील विषारी वायूमुळे कर्मचाऱ्यांचा जीव गुदमरु लागल्याने सर्वांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली.
मात्र एक कर्मचारी टाकीतच अडकून राहिला. या कर्मचाऱ्याला बाहेर करण्यासाठी अग्निशमन दलाल पाचरण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात कर्मचाऱ्याला बाहेर काढलं, मात्र त्याचा मृत्यू झाली होता.
राकेश निकम असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर सुरेश पवार, उमेश पवार, बाळासाहेब भावरे, शांताराम भटके या कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.