Mumbai News : चेंबूरच्या महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरु
Mumbai News : मुंबईतील चेंबूरच्या महानगरपालिका शाळेतील मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : चेंबूरच्या (Chembur) आणिक गाव येथील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा (Food Posion) झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शाळेत देण्यात येणाऱ्या आमटी आणि भात सहावी आणि सातवीच्या काही विद्यार्थ्यांनी खाल्ला. त्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. यामधील 16 विद्यार्थ्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. विद्यार्थ्यांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना चक्कर देखील येऊ लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महानगरपालिकेच्या शाळेत मध्यान्ह भोजनाची व्यवस्था आहे. हे मध्यान्ह भोजन 180 विद्यार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर यामुळे 16 विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. मध्यान्ह भोजननानंतर विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. उलट्या, मळमळ यांसारखा त्रास मुलांना होऊ लागला. त्यामुळे तात्काळ या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आणि विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला...
दररोज प्रमाणे शुक्रवारी सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास चेंबूरच्या आणिक गाव परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेत माध्यन्ह भोजन आले होते.हे जेवण जेवल्यानंतर इयत्ता सहावी आणि सातवीमधील देण्यात आलं होतं. पण हे मध्यान्ह भोजन जेवल्यानंतर काहीच वेळात विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. ही बाब शाळेच्या शिक्षकांच्या लक्षात आली. त्यानंतर तात्काळ विद्यार्थ्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती यावेळी शताब्दी रुग्णालयाकडून देण्यात आली.
दरम्यान या संदर्भात चौकशी करण्याची मागणी सध्या पालकांकडून करण्यात येत आहे. तात्काळ उपचार सुरु केल्याने कोणाच्याही जीवावर सुदैवाने बेतलं नाही. पण तरीही मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना असा त्रास होत असेल तर ही बाब गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या संदर्भात आता कोणती कारवाई करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच शाळेकडूनही आता कोणती कारवाई करण्यात येते हे देखील पाहणं गरजेचं आहे.