चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
Chembur Fire : चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराखाली बांधलेल्या दुकानाला रविवारी सकाळी भीषण आग लागली होती. या आगीत गुप्ता कुटुंबियांचा होरपळून मृत्यू झाला होता.
मुंबई : चेंबुरच्या (Chembur) सिद्धार्थ कॉलनीतील (Siddharth Colony) दुमजली घराखाली बांधलेल्या दुकानाला रविवारी सकाळी भीषण आग लागली होती. या आगीत तीन मुलांसह सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. एकीकडे संपूर्ण मुंबई या घटनेने हळहळत असताना दुसरीकडे ही आग विझविण्याच्या बहाण्याने आत आलेल्या कोणीतरी या घरातील लाखोच्या ऐवजावर डल्ला मारण्याचे अमानवी कृत्य केले आहे. गुप्ता कुटुंबाच्या घरातून लाखोंची रोकड आणि 100 ग्रॅम सोने चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीत दुमजली घराखाली बांधलेल्या दुकानाला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या अग्नितांडवात छेदीराम गुप्ता यांच्यासह एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तळमजल्यावरील दुकानाला ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते.
आगीत लॉकर तोडून लाखोंचा ऐवज लंपास
याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला. काही वेळातच आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना वाचवता आले नाही. अग्निशमन दलाने सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणली. त्यानंतर आत अडकलेल्या सर्व सात जणांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. यानंतर काल रात्री या कुटुंबातील सदस्यांनी या तिजोरीतील कागदपत्र ताब्यात घेण्यासाठी या घरात प्रवेश केला असता सदरची तिजोरी तोडलेल्या अवस्थेत आणि त्यातील ऐवज चोरीला गेलेल्या अवस्थेत आढळून आली. गुप्ता कुटुंबाच्या घरातून लाखोंची रोकड आणि १०० ग्रॅम सोने चोरीला गेले आहे. याबाबत या कुटुंबाने आज चेंबूर पोलिसांना तक्रार अर्ज करुन या दागिन्यांचा शोध घेण्याची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली आहे. तसेच हे घर उभे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी आज कोणीही अधिकारी या बाबत त्यांच्याकडे फिरकले नसल्याचे या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत
दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते की, गुप्ता परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आगीत सात जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत. झालेल्या घटनेची चौकशी होणार असून योग्य तो निर्णय होईल. परंतु तो पर्यंत कुटुंबाला शासनाकडून प्रत्येक मयत व्यक्तीच्या नावे पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. जखमींवर शासनाच्या माध्यमातून उपचार केले जातील. या बाबतील इतर जे विषय आहेत त्याचा एका बैठकीत निर्णय घेतला जाईल. परंतु पुन्हा याप्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेईल. या परिवाराला तात्काळ प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची निर्णय सरकारने घेतला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा