Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी आता डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती
mukhyamantri sahayata nidhi: मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती. यापूर्वी मंगेश चिवटे या कक्षाचे प्रमुख होते.
मुंबई: राज्यात महायुतीचे सरकार येऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल होताना दिसत आहेत. याच बदलांचा एक भाग म्हणून एक महत्त्वाचा खांदेपालट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी आता डॉ. रामेश्वर नाईक (Rameshwar Naik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यापूर्वी मंगेश चिवटे (Mangesh Chivate) हे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख होते. मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते. मात्र, आता त्यांच्या जागेवर देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील डॉ. रामेश्वर नाईक यांची वर्णी लागली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाची स्थापना केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे काम किती प्रभावीपणे होऊ शकते आणि त्याचा सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी किती फायदा होऊ शकतो, याची पहिल्यांदा प्रचिती आली होती. यामध्ये मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या पदावर काम करताना मंगेश चिवटे यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा कारभार डॉ. रामेश्वर नाईक यांच्याकडे आला आहे.
कोण आहेत रामेश्वर नाईक?
डॉ. रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. 2014 साली ते वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून नियुक्त झाले होते. यानंतरच्या काळात त्यांनी काही धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणून काम पाहिले. जुलै 2021 मध्ये रामेश्वर नाईक वैद्यकीय समितीच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. तर ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यातील धर्मादायी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे नियम करणाऱ्या हेल्प डेस्कचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात डॉ. रामेश्वर नाईक यांनी उपमुख्यमंतरी वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सांभाळली होती. रामेश्वर नाईक हे भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे विश्वासू समजले जातात.
रामेश्वर नाईक यांनी विविध पदांवर काम करताना राज्यात अनेक ठिकाणी तब्बल 115 वैद्यकीय शिबिरे घेतली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर, लेप्रोसी, डायबेटिसच्या हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय, कुपोषण निर्मुलन, अवयवदानासाठीही रामेश्वर नाईक यांच्या माध्यमातून शिबिरं घेण्यात आली. याशिवाय, 89 मोतीबिंदू उपचार शिबिरे आणि 22 रक्तदान शिबिरांचे आयोजनही डॉ. नाईक यांनी केले होते.
आणखी वाचा