EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे. काही लोक EVM बाबत रान पेटवत आहे.
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने EVM वर शंका घेतली आहे. ठिठिकाणी या EVM संदर्भात आंदोलने देखील करण्यात आली. राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनात देखील विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं. मात्र, महायुतीचे पक्ष लोकसभा निवडणुकांचा दाखला देत ईव्हीएमवर आक्षेप घेणं हास्यास्पद असल्याचे म्हणत आहेत. त्यात, आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनीही ईव्हीएमच्या शंकांवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेतून निकम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. दरम्यान, विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात भाजप महायुतीला तब्बल 237 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीला केवळ 49 जागा जिंकता आल्या. त्यानंतर, राज्यात ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित करत महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं.
राज्यात ईव्हीएमविरोधी लाट निर्माण केली जात असतानाच विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर बॅलोट पेपरवर फेरमतदान घेण्याचा संकल्प केलेल्या माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी भेट देऊन ईव्हीएमच्या लढ्याला आणखी जोर दिला आहे. त्यामुळे, राज्यात ईव्हीएम विरोधातील चळवळ आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे महायुतीचे प्रमुख नेते महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देत आहेत. आता, उज्ज्वल निकम यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे. काही लोक EVM बाबत रान पेटवत आहे. मात्र, याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. विषेश म्हणजे निवडणूक आयोगाने या पूर्वीही सर्व पक्षाच्या प्रतिनिधीसमोर EVM ची विषेश तपासणी घेतली होती. मात्र, आज पराभूत झाल्यामुळे अशा रितीने भांडवल करणे आणि सामान्य जनतेची दिशाभूल करण योग्य नाही, अशा शब्दात उज्ज्वल निकम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना फटकारले आहे. ईव्हीएमवर आरोप करणाऱ्यांकडे जर प्रमाणभूत आधार असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागेल. परंतु अंदाज आणि संशयावर कुठलीच गोष्ट कोर्टात टिकू शकणार नाह, अशी कायदेशीर अनुभवाची प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. त्यामुळे, निकम यांच्या प्रतिक्रियेकवर आता महाविकास आघाडीचे नेते काय प्रत्त्युत्तर देतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, उज्जल निकम यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.
हेही वाचा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा