ग्लोबल रुग्णालयात उपचारासाठी दीड लाख घेणाऱ्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मनसेने गुरुवारी या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी चौकशी करून पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटमध्ये आयसीयू बेडसाठी दीड लाख रुपये घेतल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर्स आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध भा.दं.वि. कलम 420, 268 आणि 34 प्रमाणे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रुग्णालयात कन्सल्टन्ट' या पदावर कार्यरत असणारे डॉ. परवेझ, श्रीमती नाजनीन, अबिद खान, ताज खान आणि अब्दुल गफार खान अशा 5 जणांविरोधात हा गुन्हा आहे. मनसेने गुरुवारी या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी चौकशी करून पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. दरम्यान या कर्मचाऱ्यांना याआधी ही असे प्रकार केले आहेत का याचा शोध ठाणे पोलीस घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. रुग्णांना आवश्यकतेनुसार आयसीयु व ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ठाणे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाच्या प्रवेशासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप वसईतील रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता. खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेतल्याने ठाणे ग्लोबल रुग्णालयात दाखल करून देतो असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. यासंबंधी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी प्रसारमाध्यमं समोर हे प्रकरण आणले होते. त्यानंतर महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने डॉ. अविनाश माळगावकर यांनी काल रात्री कापूरबावडी पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
Thane Corona Vaccination | एकही लस उपलब्ध नाही, ठाण्यातील लसीकरण ठप्प
ग्लोबल रुग्णालयाचे काम मे.ओमसाई आरोग्य केयर प्रा.लि ला देण्यात आले होते. रूग्णांना ऍडमिट करायचे असल्यास वॉर रूम मध्ये फोन करून नंतरच ऍडमिट करून घेत असतात, मात्र परस्पर या कंपनी मधील कर्मचाऱ्यांना बेड देण्याचा अधिकार कोणी दिला. ठाणे महापलिकेच्या अधिकाऱ्यांचा अंकुश नव्हता का ? अशी अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत. त्यातच ग्लोबलमध्ये दीड लाख घेऊन दाखल केलेला रुग्ण हा दगावल्याने पुन्हा एकच खळबळ उडालेली आहे.