मुख्यमंत्र्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस, उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेचे आमदार म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळाने केली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस करण्यात आली. राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे एकीकडे राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा नेटाने सामना करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोणताही घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी राज्यपालांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेचे आमदार नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. संविधानाच्या कलम 164 (4) अंतर्गत उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात राज्याच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनणं अनिवार्य आहे. उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी 28 मे आधी विधीमंडळाचा सदस्य बनणं आवश्यक आहे. मात्र सध्या कोरोनाचं संकट पाहता ही विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या परिस्थितीत घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळात एकमताने घेण्यात आला. आता या शिफारशीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी निर्णय घेणार आहेत.
अजित पवारांच्या नेतृत्त्वात उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली. ते म्हणाले की, "आजची मंत्रिमंडळ बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. कोरोना आणि राज्यातील घटनात्मक पेचासंदर्भात ही बैठक होती. मुख्यमंत्र्यांना सहा महिन्याच्या विधीमंडळाच्या सभागृहाचे सदस्य बनणं बंधनकारक आहे. कोरोनामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. घटनात्मक पेच निर्माण होऊ नये, यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल कोट्यातील एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत हा निर्णय होता, त्यामुळ या बैठकीला उपस्थित राहू नये अशी विनंती उद्धव ठाकरेंना करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला."
विधानपरिषदेच्या निवडणुका लांबणीवर येत्या 24 एप्रिल रोजी विधानपरिषदेच्या नऊ सदस्यांची मुदत संपत आहे. परंतु या नऊ जागांसाठी होणारी निवडणूक कोरोनामुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. विधानपरिषदेतील राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर, काँग्रेसचे हरीसिंह राठोड, शिवसनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपचे अरुण अडसड, पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ आणि याची मुदत येत्या 24 एप्रिल रोजी संपत आहे.