गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर बुकींग करा किंवा सोसायटीबाहेरुन पालिका कर्मचाऱ्यांकडे मूर्ती पाठवा, महापालिकेचं आवाहन
गणेशोत्सवाला आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. कोरोनाचे विघ्न असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारी यंत्रणांमार्फत केले जात आहेत.
मुंबई : यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. अशातच गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेकडूनही नियमावली जारी करण्यात आली आहे. आता गणपती विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. गणेश विसर्जनासाठी चौपाटीवर बुकींग करा किंवा सोसायटीच्या गेटवरुनच महापालिकेनं नेमलेल्या कर्मचाऱ्यांकरवी गणेश मूर्ती विसर्जनाला पाठवा, अशी शक्कल महापालिकेच्या डी विभागाकडून काढण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी चौपाटीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा उपाय मुंबई महानगरपालिकेने शोधला आहे. तसेच विसर्जनासाठी ऑनलाईन अॅप तयार करण्याचा विचारही महापालिकेकडून सुरु असून अद्याप डी विभागाकडून याबाबतचे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही.
गिरगांव चौपाटीवर मुंबईभरातून गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत असतात. मात्र, डी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नानाचौक, ताडदेव, मलबार हिल येथील गणेशमूर्तींची संख्या जास्त असते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटीवर गर्दी होऊ नये म्हणून वेळ निश्चित करुन विसर्जनाला, असं आवाहन पालिकेकडून केलं जाणार आहे. तसेच, गणेशमूर्तींना विसर्जनाला नेण्यासाठी महापालिकेनं नेमलेले कर्मचारी, स्वयंसेवक हे सोसायट्यांच्या गेटपर्यंत येतील आणि तिथुनच मूर्ती चौपाटीवर घेऊन जातील. ज्यामुळे, रहिवाशांना गणेश विसर्जनासाठी सोसायटीबाहेरही पडण्याची गरज भासणार नाही. अशी कार्यप्रणाली गणपती विसर्जनासाठी काही दिवसांत महापालिकेकडून तयार केली जाणार आहे.
गणेशोत्सवाला आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. कोरोनाचे विघ्न असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारी यंत्रणांमार्फत केले जात आहेत. पालिका प्रशासनाने सार्वजनिक आणि घरगुती गणपतींसाठी नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक मूर्तीची उंची कमी करण्यात आली असून घरगुती गणपतीचेही घरच्या घरी किंवा पुढच्या वर्षी विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बीएमसीची घरगुती गणेशोत्सवासाठी नियमावली; स्थापना आणि विसर्जनाला 5 जणांनाच परवानगी
दरवर्षी मुंबईत 11 दिवसांत तब्बल दोन ते अडीच लाख मूर्तीचे विसर्जन होते. यावर्षी हे प्रमाण कमी होण्याची शक्यता असली, तरी काही प्रमाणात तरी मूर्ती विसर्जनासाठी येतील. हे गृहीत धरून पालिकेने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत 69 नैसर्गिक विसर्जन स्थळे असून साधारण 32 कृत्रिम तलाव पालिकेतर्फे तयार केले जातात. यावर्षी नैसर्गिक विसर्जन स्थळावरील समुद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत.
बाप्पांची उंची, कार्यकर्त्यांची संख्या किती असावी?, गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर
दरम्यान, जर नियोजनाप्रमाणे गणेश विसर्जनासाठी वेळ बुक करणारे अॅप तयार झाले तर, भाविकांना वेळ ठरवून येता येईल. कृत्रिम तलावावर फक्त मूर्ती देऊन त्यांनी निघून जायचे आहे. एका वेळेला साधारण दहा ते पंधरा लोकांना वेळ दिला जाईल, अशी माहिती डी विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
एक प्रभाग-एक गणपती संकल्पनेसाठी मुंबई महापालिका प्रशासनाचं आवाहन
कोरोनामुळे यंदा बाप्पाला दागिन्यांचा साज नाही, बाप्पाचे सुवर्णालंकार घडवणारे कारागीर संकटात