BJP OBC Reservation March : भाजपचा मोर्चा पोलिसांनी रोखला; पाटील, मुनगंटीवार, दरेकर, पडळकर ताब्यात
ओबीसी आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला धडक मोर्चा भाजप कार्यालयाबाहेरच पोलिसांनी रोखला. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुंबई : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला धडक मोर्चा भाजप कार्यालयातच पोलिसांनी रोखला आहे. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून द्या या मागणीसाठी भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढण्यात येत आहे. यानंतर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे आमदार आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले. भाजप कार्यालय ते मंत्रालय असा हा मोर्चा होता.
कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भाजपच्या नेत्यांसह महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या महिला कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोरच ठिय्या मांडून सरकारविरोधात घोषणा देऊन निषेध नोंदवला. त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं जात असून पुढील प्रक्रिया केली जात आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांनी ओबीसींना फसवलं : चंद्रकांत पाटील
"महाविकास आघाडीतील नेत्यांनी ओबीसी समाजातील लोकांना फसवलं असल्यामुळे ते आज भाजपच्या कार्यालयात आले आहेत. लोकांना देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्त्व हवं आहे. पवार साहेबांनी लोकांना फसवलं आहे. महाविकास आघाडीच्या हातात सरकार आहे. त्यांच्या पक्षातले काही लोक रस्त्यावर उतरले आहेत," चंद्रकांत पाटील म्हणाले.
पवार कुटुंब केंद्र सरकारला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यात आणत आहे : पडळकर
"सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे मुद्दाम केंद्र सरकारला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यात आणत आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्याला ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती. तुम्ही आयोग स्थापन करणार नाही, ओबीसींचा सॅम्पल सर्व्हे करणार नाही, राजकीय मागासलेपणाचा सर्व्हे करणार नाही, आरक्षणाची टक्केवारी ठरवणार नाही. या गोष्टी न करता केंद्राच्या नावाने शिमगा करायचं हे फक्त पवार कुटुंब करु शकतं. पवार कुटुंबाचा दिखावा राज्याला दिसला आहे," असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.