इंदोरीकर महाराजांचं समर्थन नाही, 'ते' वक्तव्य चुकीचंच : चंद्रकांत पाटील
'मी इंदोरीकर महाराजांचं समर्थन करत नाही. त्यांनी महिलांबद्दल ते विधान करायला नको होतं. दिवसरात्र किर्तनं करून तो माणूस समाज प्रबोधनाचं काम करतोय, 'त्या' एका वक्तव्यावर त्या माणसाची सारी तपश्चर्या घालवू नका', असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना दिला आहे.
मुंबई : किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेकांनी याप्रकरणी आपली मतं मांडली आहेत. अनेकांनी इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर अनेकांनी त्यांना पाठिंबाही दर्शवला आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मात्र इंदोरीकर महाराजांनी भाजपाचा पाठींबा असल्याची माहिती दिली आहे. पण त्यांनी महिलांबाबतचं हे विधान करायला नको होतं, असंही ते बोलताना म्हणाले आहेत.
इंदोरीकर महाराजांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'मी इंदोरीकर महाराजांचं समर्थन करत नाही. त्यांनी महिलांबद्दल ते विधान करायला नको होतं. दिवसरात्र किर्तनं करून तो माणूस समाज प्रबोधनाचं काम करतोय, 'त्या' एका वक्तव्यावर त्या माणसाची सारी तपश्चर्या घालवू नका', असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना दिला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले की, 'भाजपच्या वतीने 22 ऐवजी 25 फेब्रुवारीला राज्यभरातील 400 तहसिल कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी आणि महिलांच्या समस्येबाबत आंदोलन करण्यात येणार आहे.'
मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वारंवार खोटं बोलत आहेत. विरोधात बसण्याचा जनादेश मिळूनही सत्तेत बसले आहेत. आम्ही हे सरकार पाडणार नाही, हे सरकार आपोआप पडेल. असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावं, असं आव्हान भाजपला दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
संबंधित बातम्या :
हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान
अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल; फडणवीसांचा शिवसेनाला टोला