(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजप कार्यकारिणी बैठक; मंचावर आयाराम नेत्यांना पहिल्या रांगेत मान, तर एकनाथ खडसेंना दुसऱ्या रांगेत स्थान
भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला मंचावर आयाराम नेते उदयनराजे भोसले, नारायण राणे आणि गणेश नाईक पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळाला आहे. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे दुसऱ्या रांगेत बसवण्यात आलं.
नवी मुंबई : भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मात्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या मंचावरील चित्र पाहून भाजप कार्यकर्त्यांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंचावर इतर पक्षातून आयात केलेल्या नेत्यांना पहिल्या रांगेत बसवण्यात आलं आहे. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दुसऱ्या रांगेत बसवण्यात आलं होतं. काही वेळातच एकनाथ खडसे यांना पुन्हा पहिल्या रांगेत गणेश नाईकांच्या शेजारी बसवण्यात आलं.
भाजपच्या या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पहिल्या रांगेत साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, नारायण राणे आणि गणेश नाईक यांना स्थान देण्यात आलं आहे. तर एकनाथ खडसेंना दुसऱ्या रांगेत बसवण्यात आलं होतं. मात्र कार्यकर्त्यांची कुजबुज कळताच भाजप नेत्यांनी एकनाथ खडसे यांना पुढच्या रांगेत बसण्याची विनंती केली. एकनाथ खडसे यांना सातत्याने डावलण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, ही गोष्ट आता लपून राहिलेली.
'कल भी हमारा था, आज भी हमारा है, कल भी हमारा होगा'
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी म्हटलं की, 'कल भी हमारा था, आज भी हमारा है, कल भी हमारा होगा'. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पक्ष, डीएमके या पक्षांना वंशवादाची लागण झाली आहे. फक्त भाजप असा पक्ष जो एका चहावाल्याला पंतप्रधान आणि मिल कामगाराच्या मुलाला राज्याचा प्रदेशाध्यक्ष (चंद्रकांत पाटील) बनवू शकतो.
महाराष्ट्रात आज आपलं सरकार नसलं तरी मागच्या पाच वर्षात फडणवीस सरकारने अकल्पनिय कामं केलं आहे. महाराष्ट्राने भाजपला जनादेश दिला होता यात शंका नाही. पण जनादेशाचा अनादर करत महाविकास आघाडीचं अनैसर्गिक आणि अव्यवहारिक सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे आता 'ऑल व्हर्सेस वन' या भूमिकेत आपण आलो पाहिजे.आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप एकहाती सत्तेसाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज आहे. चांगला बॅट्समन तो असतो जो क्रिजवर टिकून खेळतो आणि चांगला बॉलर तो जो बॉल योग्य ठिकाणी फिरकी टाकतो. त्यामुळे राजकारणातही घाईगडबडीतमध्ये खेळण्याची गरज नाही. जोर लावून मस्तीत खेळा, असं जेपी नड्डा यांनी सांगितलं.