Kirit Somaiya: राऊतांच्या आरोपाला आता 'दिल्ली'तून उत्तर; किरीट सोमय्यांची उद्या पत्रकार परिषद
Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या हे दलाल असल्याचा आरोप केला होता. त्यावर आता किरीट सोमय्या उत्तर देणार आहेत.
नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि किरीट सोमय्यांवर आरोपांची राळ उठवली. त्याचा आरोपांवर आता दिल्लीतून उत्तर मिळणार आहे. उद्या म्हणजे बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता भाजप नेते किरीट सोमय्या हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर देणार आहेत.
खासदार संजय राऊत यांनी आज केलेल्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे दिल्लीमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. संजय राऊतांच्या आरोपांवर उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या उत्तर देणार आहेत.
त्या आधी दुपारी यावर किरीट सोमय्या यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती. भाजप नेते किरीट सोमय्या ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "2017 साली सामनातून अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी प्रा डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता माझ्या मुलाचे नाव घेतलं आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध 10 खटले दाखल केले आहेत तर अजून तीन तीन खटले पाईपलाईनमध्ये आहेत. मला त्यांची परिस्थिती समजते. मी आणखी एका प्रकरणाचं स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. कोणत्याही भ्रष्ट व्यवहारात गुंतलेलो नाही."
काय म्हणाले संजय राऊत?
पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असं खासदार संजय राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या दलाल असल्याचा आरोप
खासदार संजय राऊत भाजप नेते किरीट सोमय्याविषयी बोलताना म्हणाले की, "छत्रपतींच्या या राज्यामध्ये या आधी असं घाणेरडे राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या रोज काही ना काही बातम्या उठवायच्या. पण या बातम्या जो सांगतो ना तो दलाल आहे. किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचं थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार?
महत्त्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut: PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानचा किरीट सोमय्यांशी आर्थिक संबंध, किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांना अटक करा: संजय राऊत
- Sanjay Raut PC 10 Points: पीएमसी बँक घोटाळा ते केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप... संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील 10 प्रमुख मुद्दे
- आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है!, अमृता फडणवीसांचा राऊतांवर निशाणा