Andheri : अंधेरी पूर्वच्या जागेवरून भाजप-शिंदे गटाच वादाची ठिणगी पडणार? भाजपचा पहिला उमेदवार जाहीर
BJP Vs Shiv Sena : अंधेरीतील कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आमदार आणि निरीक्षक अमित साटम यांनी अंधेरी पूर्वची जागा भाजप लढणार असल्याचं सांगत मुरजी पटेल यांच्या नावाची घोषणा केली.
मुंबई : एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून 24 तासही उलटत नाहीत तोपर्यंतच अंधेरी पूर्व जागेवरून महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अंधेरी पूर्वची जागा भाजपच लढणार आणि जिंकणार असं भाजपचे आमदार आणि निरीक्षक अमित साटम यांनी म्हटलंय. मुरजी पटेल हेच भाजपचे उमेदवार असतील असंही त्यांनी जाहीर केलं.
विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने शिल्लक राहिले असतानाच सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व विधानसभेत भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणूक निरीक्षक आणि आमदार अमित साटम यांनी मोठी घोषणा केली.
स्वीकृती शर्माही निवडणूक लढवणार?
आमदार अमित साटम यांच्या या घोषणेमुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडू शकते. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांचा पक्षप्रवेश करून अंधेरी पूर्व विधानसभेवर दावा केला. त्याला 24 तास उलटत नाही तोच आज अमित साटम यांनी महायुतीत अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपच लढणार कमळाच्या चिन्हावर लढणार आणि जिंकणार अशी घोषणा केली आहे.
मुरजी पटेलांची जोरदार तयारी सुरू
मुरजी पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. त्यावेळीच शिवसेने शिंदे गट आणि भाजपमध्ये या जागेवरून काहीसा वाद झाल्याचं दिसून आलं होतं. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने दिवंगत ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. नंतर या निवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
पोटनिवडणुकीत जरी मुरजी पटेल यांनी माघार घेतली असली तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकीची त्यांनी तयारी मात्र जोरदार केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ते जवळचे मानले जातात. तसेच उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची संख्या लक्षात घेता त्यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे.
शिवसेना- भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वादग्रस्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्या अंधेरी पूर्वमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून अमित साटम यांनी केलेल्या दाव्यामुळे शिवसेना शिंदे गट व भाजप या दोन्ही पक्षात उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडू शकते.
ही बातमी वाचा: