एक्स्प्लोर
दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार; बायोमेट्रिक हजेरी सक्तीची होणार
मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. त्यानंतर आता नगरसेवकांसाठीदेखील बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याबाबतचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. त्यानंतर आता नगरसेवकांसाठीदेखील बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याबाबतचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. पालिका सभागृहात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन मंजुरी घेतली जाते. विकासकामे व अनेक धोरणात्मक निर्णय येथे घेतले जातात. निर्णय घेताना नगरसेवकांची उपस्थिती महत्त्वाची ठरते. सभागृहात अनेक वेळा महत्त्वाचे प्रस्ताव, ठराव मंजूर केले जातात. यासाठी नगरसेवकांची पुरेशी संख्या असणे गरजेचे असते. मात्र अनेक नगरसेवक सभागृहाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. सभागृहाच्या बैठकीस केवळ हजेरीची स्वाक्षरी करण्यापुरते उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना महत्त्वाच्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी व्हिप काढावा लागत होता. त्यामुळे अशा उशिरा येणाऱ्या आणि लवकर पळ काढणाऱ्या नगरसेवकांना वेसण घालण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. मनोज कोटक यांनी मांडलेल्या प्रस्तावाला गटनेत्यांनी दिड वर्षपूर्वी मंजुरी दिली होती. याप्रस्तावावर पालिका आयुक्तांचा अभिप्राय मागवण्यात आला होता. त्यावर तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनीही बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यास होकार दर्शवला होता. त्यानंतर हा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. त्याबाबत पालिका आयुक्तांचा अभिप्राय आल्याने आज गटनेत्यांच्या बैठकीत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अंलबजावणी लवकरच केली जाईल. परंतु गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांचे मानधन कापले जाणार का? याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.
आणखी वाचा























