Basavraj Patil and Rashmi Bagal : काँग्रेस आणि ठाकरे गटाला मोठा धक्का, बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भाजपमध्ये प्रवेश
Basavraj Patil and Rashmi Bagal : मराठवाड्यात काँग्रेसला तर सोलापुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मराठवाड्यातील नेते बसवराज पाटील (Basavraj Patil) आणि सोलापुरातील ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी बागल (Rashmi Bagal) यांनी आज (दि.27) भाजपमध्ये प्रवेश केलाय.
Basavraj Patil and Rashmi Bagal : मराठवाड्यात काँग्रेसला तर सोलापुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मराठवाड्यातील नेते बसवराज पाटील (Basavraj Patil) आणि सोलापुरातील ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी बागल (Rashmi Bagal) यांनी आज (दि.27) भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. मुंबईत हा पक्ष प्रवेश पार पडला.
40 वर्षे निष्ठेने काम केले, माझी कोणाबाबत तक्रार नाही
बसवराज पाटील म्हणाले, संपूर्ण देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. विकसित भारत म्हणून आज मोदींच्या नेतृत्वाच वाटचाल सुरु आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. देशात त्यांच्यामागे मोठी शक्ती उभे करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, त्यासाठी हा निर्णय घेतलाय.
निष्ठेने भाजपचे काम करत राहू
राज्यातील प्रत्येक घटकाला कसा न्याय देता येईल, यासाठी फडणवीस साहेब नेतृत्व करत आहेत. याच विचाराने मी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मी 40 वर्ष काँग्रेसमध्ये होतो. मी अतिशय प्रामाणिकपणे काम केले. आज त्याच निष्ठेने भाजपचे काम करत राहू. माझी कोणाबाबत तक्रार नाही, असे बसवराज पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
येत्या काळात पक्ष प्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट दिसतील
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा राहुल गांधींवर विश्वास राहिला नाही. मोदींवर लोकांचा विश्वास आहे. राहुल गांधी यांची विश्वासार्हता कमी झाली. ते कधीही देशाचे भले करु शकत नाही. त्यांनी ओबीसी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महाराष्ट्रचा अपमान केलेला आहे. येत्या काळात पक्ष प्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट दिसतील. महाराष्ट्राचा विश्वास मोदीजी आणि फडणवीस यांच्यावर आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.
कशी आहे बसवराज पाटील यांची कारकीर्द
मुरूम (ता. उमरगा) येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. 1992 मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी मिळाले होते. 1995 मध्ये त्यांनी उमरगा विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. 1999 च्या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर पक्षाने त्यांना ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्रिपद दिले. 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. 2009 च्या निवडणुकीपासून उमरगा मतदारसंघ राखीव झाला.
त्यामुळे पाटलांनी शेजारच्या औसा (जि. लातूर) मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली. औसा विधानसभा मतदार संघातून बसवराज पाटील मुरूमकर यांना उमेदवारी देण्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपलं पक्षातील वजन वापरलं होतं. 2019 आणि 2014 च्या निवडणुकीतही ते औसा मतदार संघातून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का, अशोक चव्हाणा यांच्यानंतर चाकूरकरांचे मानसपुत्र भाजपात जाणार