(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lockdown | वांद्रे गर्दी प्रकरण, आरोपी विनय दुबेला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
वांद्रे येथील गर्दी प्रकरणाला विनय दुबे जबाबदार असल्याचे आढळून आलं होतं. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. एका व्हिडीओद्वारे मजुरांना याप्रकरणी आंदोलन करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्य़ात आला आहे.
मुंबई : सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवून मंगळवारी वांद्रे स्थानकाबाहेर उसळलेल्या गर्दीला कारणीभूत ठरल्याबद्दल विनय दुबेला नवी मुंबईतून रात्री अटक करण्यात आली होती. विनय दुबेला बुधवारी दुपारी वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं. मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी रेल्वे न सोडल्यास राष्ट्रव्यापी आंदोलन छेडू, असा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केल्याप्रकरणी विनय दुबेला न्यायाधीशांनी 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा ठोठावली. मात्र दुबेच्या वतीने या आरोपांचं खंडन करण्यात आलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला 14 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन संपल्यानंतर गावी जाण्यासाठी हजारो मजूर बुधवारी वांद्रे स्थानकाबाहेर जमले होते. मात्र जमावबंदी असतानाही मजुरांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने मुंबई पोलिसांनी एक हजार लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी अधिक तपासानंतर पोलिसांना विनय दुबे जबाबदार असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला नवी मुंबईतील ऐरोली येथून मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. एका व्हिडीओद्वारे मजुरांना याप्रकरणी आंदोलन करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत त्याच्या विरोधात कलम 177, 153(a), 188, 269, 270 आणि 505(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वांद्रे येथील मॅजिस्ट्रेट कोर्टात न्यायाधीश यांच्यासमोर आरोपी विनय दुबेला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी समाजमाध्यमांवर अफवा पसरवणारे व्हिडीओ अपलोड केल्यामुळेच मजूर रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येने जमले असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीशांनी आरोपी विनय दुबे याला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
मंगळवारी (14 एप्रिल) दुपारी वांद्रे स्टेशन बाहेरील जामा मशिदीच्या जवळ हजारो लोक जमले होते. यामध्ये अधिक परप्रांतीय मजूर होते. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या मजुरांची मागणी होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सर्वांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केले. मात्र गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. त्यानंतर गर्दी नियंत्रणात आली. लॉकडाऊनमुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक 3 मे पर्यंत बंद आहे. राज्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत हातात कामधंदा नसताना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न या मजुरांपुढे आहे. मात्र एवढी मोठी गर्दी याठिकाणी कशी जमली की ती जमवली होती. या अशा अनेक बाबींचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.
संबंधित बातम्या :
- तुम्ही महाराष्ट्रात आहात चिंता करू नका, परप्रांतियांना मुख्यमंत्र्यांचा आवाहन
- मुंबईत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी
- Lockdown | वांद्रे गर्दी प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा
- Coronavirus | भारताच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचलावा : मोदी
- corona lockdown | ज्येष्ठ नागरिकांनो घराबाहेर पडू नका, केंद्र सरकारची सूचनावली
Bandra Crowd Issue | वांद्रे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी, गावी परत जाण्याची मागणी