Lockdown | वांद्रे गर्दी प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा
मुंबईच्या वांद्रे स्टेशन बाहेर आज दुपारी परराज्यातील नागरिकांनी, मजुरांनी मोठी गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येने हे मजूर जमल्याने कायदासुव्यवस्थेचा प्रश्न याठिकाणी निर्माण झाला होता. यावरून मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई : लॉकडाऊनदरम्यान मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर जमलेली गर्दी घरी परतण्याची मागणी करत आहे. याठिकाणी जमलेले सर्व मजुर उत्तर प्रदेश, बिहार अशा परराज्यातील आहेत. हे कामगार गेल्या 21 दिवसांपासून इथे थांबले आहेत. हातात काम नाही, त्यामुळे त्यांची दोन वेळच्या जेवणाचीही गैरसोय होत आहे. यावरून मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठीचा मुद्दा उपस्थित केला होता. वांद्रे रेल्वे स्टेशन बाहेरील सध्याची स्थिती नियंत्रणात आहे. सूरतमध्ये काही दिवसांपूर्वी काही मजुरांनी दंगे केले होते. मात्र त्यांनाही घरी पोहोचवण्याबाबत केंद्र सरकार अद्याप कोणताही निर्णय घेऊ शकलेलं नाही. आज वांद्रे स्टेशनबाहेर जमलेले मजुर जेवण किंवा राहण्याच्या व्यवस्थेची मागणी करत नाहीत, तर त्यांना घरी जायचं आहे."
The law and order situation in Surat, Gujarat, largely has been seen as a similar situation and the feedback from all migrant labour camps is similar. Many are refusing to eat or stay in. Currently more than 6 lakh people are housed in various shelter camps across Maha.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 14, 2020
पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरेेंनी घटनास्थळी येण्याची गरज होती- आशिष शेलार
आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटनंतर भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी त्यांना उत्तर दिलं. खरंतर पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी तातडीने येण्याची गरज होती. किमान घटनेची खरी माहिती तरी घेणे अपेक्षित होतं. चार-पाच दिवसापूर्वी बांधकाम आणि नाका कामगार संघटनेने या परिसरात निदर्शने केली होती, ती निदर्शने सरकारने गांभीर्याने का घेतली नाहीत? सरकारने त्यां संघटनेशी चर्चा का केली नाही? त्यांची मागणी ही रेशनिंगचे धान्य आणि अन्न मिळावे हीच होती. मुंबईच्या विविध भागातून आज अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का? नाका व बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देणे असलेली हक्काची मदत या कामगारांना अजून का मिळाली नाही ? ती फाईल कुठल्या डेबलवर का अडकली आहे? असे प्रश्न आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना विचारले.
संबंधित बातम्या : मुंबईत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी Coronavirus | भारताच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचलावा : मोदीBandra Crowd Issue | वांद्रे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी, गावी परत जाण्याची मागणी