(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शहराचं नाव बदलून वातावरण खराब करण्याची गरज नाही : बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरणाबाबत काँग्रेसची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. आपली जबाबदारी राजकारणी म्हणून, पक्ष म्हणून चांगलं काम करण्याचं आहे, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.
मुंबई : सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या शहराचं, परिसराचं नाव बदलून तिथलं वातावरण बिघडवू नका, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. जरी शहराचं नाव बदललं गेलं तरी लोकांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो? काय फरक पडतो? असा सवालही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बोलताना म्हणाले की, "उत्तम काम कसं होऊ शकतं याचा आदर्श महाविकास आघाडीने घालून दिलेला आहे. पण असं असलं तरीदेखील कोणत्याही एका शहराचं, गावाचं नाव बदलून वातावरण प्रदूषिक करण्याचं काही कारण नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे. तो किमान समान कार्यक्रमाचा भागही नाही, त्यामुळे अशा प्रकारांना आमचा पहिल्यापासून विरोध आहे. छत्रपती संभाजी महाराज आमचेही आदर्श आहेत. सर्वांचेच श्रद्धास्थान आहेत. परंतु, याप्रकरणात सामाजिक तेढ वाढू नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. खरंतर जिथे सरकारी डिपार्टमेंट काम करतं तिथे अशाप्रकारची चूक होता कामा नये, म्हणून मी त्यासंदर्भातील ट्वीट केलेलं आहे."
पाहा व्हिडीओ : बाळासाहेब थोरात यांची पत्रकार परिषद
शहराचं नाव बदलल्यामुळं लोकांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो? : बाळासाहेब थोरात
"छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने औरंगाबाद विमानतळाचा ठराव आम्ही संमत केला असून तो केंद्राकडे पाठवला आहे. तो अद्याप मान्य झालेला नाही. त्याची जबाबदारी आता केंद्र सरकारची आणि भाजपची आहे की, ती मंजुर करुन घेणं. पण ते करण्यास त्यांची तयारी नसल्याचं चित्र आहे. कोणत्याही शहराचं नाव मात्र अशा पद्धतीनं बदलू नये. काही राज्यांमधील ज्या शहरांची नाव बदलली आहेत, त्या शहरांतील सर्वसामान्य माणूस, गरिब माणूस आहे, त्यांच्या जीवनात काय परिणाम झाला का? जेव्हा आपण सरकार म्हणून काम करतो, ते आपण जनतेमध्ये आनंद निर्माण करण्याकरता करतोय तेढ निर्माण करण्याकरत नाही." असं बाळासाहेब थोरात पुढे बोलताना म्हणाले.
सीएमओ कार्यालयाकडून ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता. त्यासंदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की, "ज्यावेळी सरकारी यंत्रणा काम करते त्यावेळी त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. कारण तो एक सरकारी दस्तावेज असतो. पुढच्या काळात घेतली जावी. कदाचित चुकून काही घडलं असेल तर ठिक आहे. पण पुढच्या काळात ही काळजी घेण्यात यावी. म्हणून मी माझं म्हणणं ट्वीटद्वारे मांडलं आहे."
बाळासाहेब थोरात म्हणाले की, "काँग्रेस पक्षाचा कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोध आहे. काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांचे किमान समान कार्यक्रम हा सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात आनंद निर्माण करणं याकरता काम करायचं आहे. हे साधं सूत्र आहे."
महत्त्वाच्या बातम्या :