(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा अभियानासाठी मुंबई महानगर सज्ज, घरोघरी वितरित करणार राष्ट्रध्वज
Azadi ka Amrit Mahotsav : मुंबई महानगरपालिका घरोघरी राष्ट्रध्वज वितरीत करणार आहे. त्यासाठी 40 लाख राष्ट्रध्वज खरेदी करण्यात आले आहेत. तर टाटा समुहाने एक लाख राष्ट्रध्वज महानगरपालिकेला दिले आहेत.
मुंबई : आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा करण्यासाठी शनिवारपासून सोमवारपर्यंत मुंबई महानगरात घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील प्रत्येक घरी राष्ट्रध्वज पोहोचविण्याचे काम महानगरपालिकेच्या यंत्रणेने बजावले आहे.
घरोघरी तिरंगा अभियानात सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावे, राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या घरी फडकवताना केशरी रंगाची पट्टी वरच्या दिशेला तर हिरव्या रंगाची पट्टी खालच्या दिशेला अशा योग्य स्थितीत राष्ट्रध्वज फडकवावा, अभियान कालावधी संपल्यानंतर आपला राष्ट्रध्वज तिरंगा संस्मरणीय आठवण म्हणून आपल्या घरी जपून ठेवावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
पालिका घरोघरी राष्ट्रध्वज वितरीत करणार आहे. त्यासाठी 40 लाख राष्ट्रध्वज खरेदी करण्यात आले आहेत. तर टाटा समुहाने एक लाख राष्ट्रध्वज महानगरपालिकेला दिले आहेत. असे 41 लाख राष्ट्रध्वज 24 विभाग कार्यालये आणि इतर खात्यांच्या माध्यमातून मुंबईतील घरोघरी पोहोचवले आहेत.
मुंबईत आतापर्यंत विविध ठिकाणी साडेचार हजार बॅनर्स, 350 होर्डिंग्ज, एक हजार डिजिटल होर्डिंग्ज, दीड हजार उभे फलक आणि 350 बसथांबा जाहिरात प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यासोबत सार्वजनिक ठिकाणे, व्यापारी संकुल, विविध कंपन्यांची कार्यालये, शासकीय – निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणी सांगितिक उद्घोषणा करण्यात येत आहे. यासोबत मुंबईतील विविध चित्रपटगृहातून चित्रपटांच्या प्रारंभी आणि मध्यंतरावेळी अभियान संदर्भातील दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या शाळांद्वारे देखील व्यापक प्रमाणावर उपक्रम राबविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्रभातफेरी, सामूहिक राष्ट्रगीत गायन, निबंध, चित्रकला , रांगोळी, वेशभूषा, भित्तीचित्रे, घोषवाक्ये यासारख्या स्पर्धांद्वारे घरोघरी तिरंगा अभियान संकल्पना सर्वत्र पोहोचविण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या 51 शाळा इमारतींवर तिरंगा विद्युत रोशणाई करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या उद्यान अधीक्षक कार्यालयामार्फत मुंबईतील 165 ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम सुरु करण्यात आला असून त्यातून तीन हजार 170 वृक्ष लावण्यात येत आहेत. सर्व विभाग कार्यालयांनी देखील आपापल्या स्तरावर नागरिकांचे मेळावे, प्रभातफेरी, ठिकठिकाणी पथनाट्ये, महत्त्वाचे रस्ते आणि पूल व विद्युत खांबांवर एलईडी रोशणाई करुन परिसर सुशोभित केले आहेत. या व्यतिरिक्त देखील वैविध्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा अभियानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.