Crime news: इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, बनावट आयडी बनवून स्वत:च बनला कमिशनर; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
Vasai news crime: वाहनचालक बनला तोतया आयकर आयुक्त. नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 40 च्या वर सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांना फसवणूक
वसई: आयकर विभागात सहाय्यक आयुक्त, आयकर निरीक्षक या पदावर नोकरी लावून देतो असे सांगून, 40 पेक्षा अधिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा तोतया आयकर आयुक्त याचा भांडाफोड करण्यात विरार क्राईम ब्रांच 03 च्या पथकाला यश आले आहे. या आरोपीकडून आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त, आयकर निरीक्षक, गृह विभागाचे सहाय्यक आयुक्त, सीबीआय विभागाचे पोलीस आयुक्त अशा प्रकारचे विविध 28 बोगस आयकार्ड ही जप्त करण्यात आले आहेत. या आरोपीला वसई न्यायालयाने 13 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रिंकू जितू शर्मा ( वय 33) असे तोतया आयकर आयुक्त चे नाव असून हा व्यवसायाने चालक असून हा मूळचा जोदपूर येथील रहिवासी आहे. सध्या हा आरोपी नवी मुंबई च्या तळोजा फेज 2 मधील, सिद्धिविनायक होम सोसायटी सर्व्हे नंबर 30 मधील रहिवाशी आहे. फिर्यादी सफरोद्दीन नयमोद्दीन खान यांच्या 25 वर्षाच्या मुलीला आयकर विभागात नोकरी लावतो असे सांगून आरोपीने वेळोवेळी 15 लाख रुपये घेतले होते. यांच्या बदल्यात त्याने आयकर विभागातील बोगस नियुक्ती पत्र, आयकार्ड ही दिले होते. फिर्यादी ने याची खातरजमा केल्या नंतर हे सर्व बोगस असल्याचे निदर्शनास आले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी ने पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने, विरार गुन्हे शाखा कक्ष 03 ने 7 जानेवारी रोजी आरोपीला नवी मुंबई तळोजा येथून अटक केले होते. या आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता त्याला 13 जानेवारी पर्यंत 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या आरोपीने एकट्याने हे गुन्हे केले आहेत की याचे अन्य कोणी साथीदार आहेत याचा पोलीस तपास करीत आहेत.
आरोपीची पार्श्वभूमी आणि गुन्हेगारीकडे कसा वळला?
आरोपी हा मूळचा जोधपूरचा राहणारा आहे. गेल्या 15 वर्षांपासून तळोजा मध्ये राहतो. आयटी विभागात ठेका पध्दतीने चारचाकी गाड्या लागतात. या ठिकाणी तो ठेकेदारामार्फत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे चालक म्हणून असायचा. कधीमधी तो अधिकारी यांच्या गाडीवर जायचा. यातून अधिकारी यांच्यासोबत त्याने ओळख वाढविली. त्यातून आयटी विभागाची माहिती करून घेतली, आणि नंतर त्याने स्वताच अक्कल लढवून, स्वताचे बोगस आयकर आयुक्त यांचे आयडी कार्ड बनविले, त्यानंतर आयकर विभागाचे शिक्के, लेटर्स बोगस बनविले. स्वत:च्या गाडीवर अंबर लावून तो स्वत: आयकर आयुक्त म्हणून फिरायचा. आणि मी आयटी विभागात आयुक्त असल्याचे भासवून तो तरुणांना कामावर लावण्याच्या बहाण्याने फसवणूक करत होता.
याने आतापर्यंत 40 च्या वर सुशिक्षित बेकार तरुणांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून, 28 च्या वर बोगस आयडी कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. या आरोपीने एकट्यानेच की साथीदार मार्फत गुन्हे केले आहेत याचा पुढील तपास पोलीस करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा