Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
Tirupati Balaji : तिरुमला येथे वैकुंठ द्वार दर्शनासाठी टोकन वाटप सुरू होण्याआधी एक मोठी घटना घडली आहे. टोकन वाटपावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे.
Tirupati Balaji Temple Stampede : जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात मोठी चेंगराचेंगरी झाली, ज्यात 6 भाविकांना आपला जीव गमवावा लागला. तिरुपती मंदिरात गुरुवारी पहाटे वैकुंठ द्वार दर्शन टोकन वाटप सुरू झालं आहे, ज्यासाठी बुधवारी संध्याकाळपासूनच भाविकांनी गर्दी झाली होती. परंतु यादरम्यान चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि यात 6 भाविकांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत.
इतकी गर्दी नेमकी का जमली?
वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजेच टीटीडी तिरुमला येथे 10 दिवस भाविकांना वैकुंठ द्वार दर्शन घेता येणार आहे. 10 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत दर्शन घेता येईल. 9 जानेवारीला पहाटे 5 वाजल्यापासून या द्वारावर दर्शन टोकन दिले जाणार होते. या टोकनसाठी भाविकांची गर्दी जमली होती. TTD ने तिरुपती आणि तिरुमला येथे SSD टोकन जारी करण्यासाठी काऊंटर उभारले आहेत.
चेंगराचेंगरी कशी झाली?
टीटीडीने सांगितल्याप्रमाणे, टोकन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. स्थानिक लोक तसेच इतर भागातील भाविक मोठ्या संख्येने काऊंटरवर पोहोचले. अचानक विष्णू धामच्या काऊंटरवर मारामारी सुरू झाली. त्यामुळे भीतीमुळे लोक इतरत्र पळू लागले आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी आहेत.
जखमींना केलं रुग्णालयात दाखल
अपघातानंतर 40 जखमींपैकी 28 जणांना रुईया हॉस्पिटलमध्ये आणि 12 जणांना सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र दुर्दैवाने रुईयामध्ये 4 आणि SIMS मध्ये 2 भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे.
#WATCH | Andhra Pradesh: A stampede-like situation occurred at Vishnu Nivasam in Tirupati during the distribution of Vaikunta Dwara Sarva Darshan tokens. More details awaited. pic.twitter.com/vhoEYGLW2U
— ANI (@ANI) January 8, 2025
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमाला श्रीवरी वैकुंठ द्वार दर्शन घेण्यासाठी तिरुपतीमधील विष्णू निवासमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. अपघातानंतर लगेचच त्यांनी तिरुपती प्रशासन आणि TTD अधिकाऱ्यांशी संवाद साधला, माहिती घेतली आणि आवश्यक आदेश दिले. चंद्राबाबू नायडू सकाळी तिरुपतीला पोहोचणार आहेत. यावेळी ते जखमींची भेट घेणार आहेत. दरम्यान, पोलिसांनी काही महिला भाविकांना सीपीआर दिल्याचे आणि जखमींना रुग्णवाहिकेत नेल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
हेही वाचा: