Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
Ajit Pawar in Delhi: राज्यातील भाजप नेत्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. वाल्मिक कराडची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी मंत्रिपद सोडावे, अशी मागणी होत आहे.
नवी दिल्ली: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिल्लीत धाव घेतली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याचे समजते. अजित पवार यांनी अमित शाह यांच्याशी तब्बल सव्वा ते दीड तास चर्चा केल्याचे समजते. यावेळी अजितदादांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे मंत्रिपद वाचवण्यासाठी अमित शाह यांना साकडे घातले, असे वृत्त 'दैनिक लोकसत्ता'ने दिले आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात 'आका' उर्फ वाल्मिक कराड आणि 'आकांचे आका' उर्फ धनंजय मुंडे यांच्याविरोधात केजचे भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार आघाडी उघडली आहे. सुरेश धस यांच्याकडून दररोज वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत सनसनाटी आरोप केले जात आहे. वाल्मिक कराड याने बीडमध्ये कशाप्रकारे गुंडगिरी चालवली आहे आणि त्याला धनंजय मुंडे यांनी कसा मुक्तहस्त दिला आहे, याविषयी सुरेश धस सातत्याने बोलत आहेत. या सगळ्यामुळे फडणवीस सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. परिणामी महायुती सरकारवर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यासाठी दबाव वाढला आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना अभय देण्याची भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कोणताही गुन्हा किंवा थेट आरोप झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची गरज नाही, असे अजितदादांचे म्हणणे आहे. परंतु, सुरेश धस आणि बीडमधील सर्वपक्षीय नेत्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना लक्ष्य करणे सुरुच ठेवल्याने महायुती सरकार कोंडीत सापडले आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि अजित पवार यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अजित पवारांच्या या दिल्लीतील भेटीविषयी बरीच गुप्तता पाळण्यात आली होती. सुरुवातीला अजित पवार दिल्लीत खासदार प्रफुल पटेल यांच्या घरी थांबले. तिकडून ते अमित शहांच्या भेटीला गेले. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवारही होते. तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीगाठींनंतर अमित शाह हे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्यास हिरवा कंदील दाखवणार का, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
आणखी वाचा