(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; हल्लेखोरांकडून ठाकरे, वरुण सरदेसाईंच्या नावाचा उल्लेख
Sandeep Deshpande : संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनी ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांचे नाव घेतले असल्याचे समोर आले आहे.
Sandeep Deshpande : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संदीप देशपांडे (Sandeeo Deshpande) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात हा हल्ला ठाकरे (Thackeray), वरुण सरदेसाईंच्या (Varun Sardesai) समर्थकांकडून करण्यात आला असल्याकडे इशारा करण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरून आता राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
संदीप देशपांडे यांनी काय जबाब दिला?
संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्क मैदानाच्या गेट क्रमांक 5 जवळ एकाने उजव्या पायावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी तीन-चार तरुणांनी स्टंप आणि बॅटने मारहाण केली. त्यातील एकाने माझ्या डोक्यावर बॅट मारण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी पुढे म्हटले की, हल्लेखोरांकडून शिवीगाळ करण्यात आली. ठाकरेंना नडतोस? वरूणला नडतोस? पत्र लिहितोस, असं हल्लेखोरांनी मला म्हटले. या मारहाणीतून वाचवण्यासाठी काही नागरीक येत असताना त्यांनाही धमकावण्यात आले. त्यानंतर हल्लेखोर राजा बडे चौकाच्या दिशेने पळून गेले असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले. हल्लोखोर निघून गेल्यानंतर मित्रांनी उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात तातडीने दाखल केले.
संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे 25 ते 30 या वयोगटातील होते. हल्लेखोर पुन्हा दिसल्यास त्यांची ओळखणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल?
शिवाजी पार्क पोलिसांनी या हल्ल्या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 307, 506(2), 504, 34 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणेंकडून सरदेसाईंवर आरोप
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानसभेतही चर्चा झाली. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत या हल्ल्यामागे वरूण सरदेसाई आहेत का, याचा तपास करण्याची मागणी केली होती.
कसा झाला हल्ला?
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला आहे. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. तर, याची माहिती समजताच शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोहोचले असून पंचनामा करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.