(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aryan Khan | आर्यन खानच्या जामीनावर कोर्ट गुरूवारी फैसला देणार का?
आर्यन खानच्या जामीनावर गुरूवारी निकाल न लागल्यास सलगच्या सुट्ट्यांमुळे किंग खानच्या मुलाचा जेलमधील मुक्काम लांबण्याची चिन्ह आहे. आर्यनसह इतरांच्या जामीनास एनसीबीचा जोरदार विरोध.
मुंबई : आर्यन खानची समाजातील प्रतिष्ठा पाहता तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपलं वजन वापरून त्याच्यावतीनं पुराव्यांशी छेडछाड आणि अन्य साक्षीदारांवर दबावही आणला जाऊ शकतो. असा दावा करत एनसीबीनं बुधवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.
आरोपीकडे अमली पदार्थ सापडोत अथवा न सापडोत, एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज सापडले नाही तरी जेव्हा एनडीपीएस कायद्यातील कलम 29 लावलं जातं तेव्हा आरोपी मुख्य सुत्रधाराइतकाच दोषी असतो असं एनसीबीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.
कोर्टाच्या कामकाजाची वेळ संपल्यानं बुधवारची कारवाई गुरूवारपर्यंत स्थगित करण्यात आली. गुरूवारी दुपारी 12 वाजता एनसीबीचा युक्तिवाद पुन्हा सुरू होईल. त्यानंतर विशेष एनडीपीएस कोर्टाचे न्यायाधीस वी.वी.पाटील हे आपला फैसला कधी देतात याकडे साऱ्यांच्या नजरा राहतील. कारण सणासुदीच्या काळात आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे गुरूवारी जर हा फैसला आला नाही तर आर्यन खानचा जेलमधील मुक्काम लांबण्याची दाट शक्यता आहे. एनसीबीनं या प्रकरणात एकूण 20 जणांना अटक केली आहे. ज्यातील चार हे ड्रग पेडलर्स असून त्यातील दोन परदेशी नागरीक आहेत. यांच्याकडनं व्यावसायिक मात्रेत ड्रग्ज हस्तगत करण्यात आली आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयालाही आम्ही या प्रकरणाची माहिती दिली असून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीशीही याचे धागेदोरे शोधले जात आहेत. बुधवारी एनसीबीनं याप्रकरणातील आरोपी आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि अन्य आरोपी मुनमुन धमेचा यांच्या जामीन अर्जाला विरोध करत आपलं उत्तर कोर्टात सादर केलं. या प्रकरणातील अन्य पाच आरोपींच्या जामीन अर्जावर 22 ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करू असं एनआयएनं स्पष्ट केलं.
दरम्यान बुधवारच्या सुनावणीत आर्यन खानतर्फे ज्येष्ठ कायदेतज्ञ अमित देसाई यांनी आर्यन खानच्या जामीनावर जोरदार युक्तिवाद केला. एनसीबीनं काय केस बनवलीय, यापेक्षा सध्या आर्यन खानचा जामीन आमच्यासाठी महत्त्वाचा आहे या वाक्यासह त्यांनी युक्तिवादाला सुरूवात केली. 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खान एका निमंत्रणावर त्या क्रुझवर गेला होता. निमंत्रण देणाऱ्याला अद्याप अटक केलेली नसल्याचं त्यांनी कोर्टाला आवर्जून सांगितलं. आर्यन टर्मिनलवरून क्रुझमध्ये प्रवेश करत असतानाच अचानकपणे एनसीबीनं तिथं धाड टाकली. त्यानंतर त्यांना शोध असलेल्या काही व्यक्तींचीच त्यांनी झाडाझडती सुरू केली आणि त्यात त्यांना एकापाठोपाठ एक अमली पदार्थ सापडत गेले. एकूणच एनसीबीनं इथं खूप चांगलं काम केलंय असं दाखवलं गेलं. मात्र, त्यांची माहिती चुकीची होती. कारण, तपासात केवळ काही जणांकडेच अमली पदार्थ सापडले आणि तेही फारच कमी प्रमाणात होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्यन खानकडे कोणताही अमली पदार्थ सापडलेला नाही. तो अमली पदार्थ इतरांमार्फत घेत होता, असा जर त्यांचा दावा असेल तर तो साफ चुकीचा आहे. कारण मुळात हे आरोप सिद्ध करण्यासाठी आरोपीकडून अमली पदार्थ हस्तगत होणं गरजेचं असतं.
याशिवाय आर्यन खानकडनं रोख रक्कमही हस्तगत झालेली नाही. त्यामुळे त्याचा हे इतरांकडे सापडलेले अमली पदार्थ विकत घेण्याचा किंवा इतरांना विकण्याचा बेत होता या गोष्टीही सिद्ध होत नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्यनविरोधातील कलमांखाली त्याला जास्तीत जास्त एका वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्याआधारावर कायद्यानं त्याला जामीन मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा दावा अमित देसाईंनी केला. एनसीबीचा दावाय की, नंतर अटक केलेल्या काही आरोपींसोबत आर्यनची चौकशी करायचीय. कारण सुरूवातीपासूनच आर्यनचा याप्रकरणात अटक केलेल्या प्रत्येक आरोपीशी संबंध जोडण्याचा एनसीबीचा प्रयत्न आहे. त्यांचा हाच प्रयत्न खोडून काढत मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं तिस-यांदा आर्यनची पोलीस कोठडी नाकारत त्याला न्यायालयीन कोठडी दिली. त्यामुळे यापुढे आर्यनच्या कोठडीतील चौकशीची गजर नसून त्याला कोर्टानं जामीनास पात्र ठरवल होतं.
मुंबई सारख्या शहरात अमली पदार्थांचं वाढत जाळं तोडण्यासाठी एनसीबीची आणि कर्तबगार अधिकाऱ्यांची गरज आहेच. मात्र, हे काम करत असताना निरपराध लोकांना आणून डांबून ठेवण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. अशी टिकाही देसाई यांनी कोर्टात केली. तसेच क्रुझवर सापडलेलं अमली पदार्थांचं प्रमाण हे ब-याचं देशात कायदेशीर आहे.
अटक केलेली मुलं फारच तरूण आहेत, त्यांची कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती नाही. त्यांनी या काळात फार भोगलंय, त्यांना मिळायचा तो धडाही मिळालाय. तेव्हा त्यांचा जामीन मंजूर करावा या टिप्पणीसह देसाईंनी आपला युक्तिवाद संपवला. याप्रकरणातील अन्य दोन आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाही निर्दोष असल्याचा दावा करत त्यांच्या वकिलांनी अधिक वेळ न दवडता आपला युक्तिवाद आटोपता घेतला. आर्यन खान हा सध्या 14 दिवससंच्या न्यायालयीन कोठडीमुळे आर्थर रोड जेलमध्ये आहे. कोरोनाकाळामुळे त्याला सध्या तिथल्या विलगीकरण सेलमध्येच ठेवण्यात आलं आहे.