(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नवी मुंबई एपीएमसीमध्ये 50 हजार पेट्या हापूस आंब्याची आवक
गेल्या तीन दिवसापासून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक एपीएमसी मार्केटला होत आहे. या ठिकाणी आलेला हापूस नवी मुंबई, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी भागात विक्रीसाठी जातो.
नवी मुंबई : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जसे सोने खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते, तसेच हापूस आंब्यालाही या दिवशी विशेष महत्व देण्यात येते. आजच्या दिवशी देवासमोर हापूस आंब्याचा नैवेद्य दाखवून हापूस आंब्याची चव चाखली जाते. त्यामुळेच दरवर्षी अक्षय तृतीयेला देवासमोर हापूसची आंबा पुजण्यासाठी मोठी मागणी असते. यावर्षी कोरोना व्हायरसचे संकट जरी घोंघावत असले तरी हापूस आंब्याचे महत्व मात्र कमी झालेले दिसत नाही. त्यामुळेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोकणातील 50 हजार पेट्या हापूस आंबा नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये दाखल झाला आहे.
गेल्या तीन दिवसापासून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक एपीएमसी मार्केटला होत आहे. या ठिकाणी आलेला हापूस नवी मुंबई, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी भागात विक्रीसाठी जात असल्याने खवय्यांनाही लॉकडाऊनच्या काळात घरात बसून सहकुटूंब हापूस आंब्यावर ताव मारण्याची संधी चालून आली आहे.
यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्गमधील हापूस आंब्याचा समावेश आहे. ऐन हापूस आंबा भरात आला असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊनचे भूत शेतकरी वर्गाच्या डोक्यावर बसले होते. त्यातच एपीएमसीमधील फळ मार्केट बंद करण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने घेतला होता. मार्केटमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी फळ मार्केट बंद केले होते. त्यामुळे हापूस आंब्याची आवक घटल्याने शेतकरी राजा चिंतेत सापडला होता.
मात्र परत एकदा सरकारने कमी गाड्यांची अट, मास्क, सॅनिटाझर टनल अशी नियमावली लागू करत फळ मार्केट सुरू केले. यामुळे हापूस आंब्याची आवक होण्यास मदत झाली आहे. हवामानातील बदल, आवकाळी पाऊस यामुळे कोकणात यावर्षी हापूस आंबा पिक मोठ्या प्रमाणात आलेले नाही. त्यामुळे मार्च महिन्याच्या तोंडावर जोरदार सुरू होणारा हापूस आंबा एप्रिल संपत आला तरी पाहिजे तसा मार्केटमध्ये दाखल होताना दिसत नाही.
आंबा पिक कमी आल्याने दरही डझनाला 300 ते 500 रूपये सुरू असल्याचे फळ मार्केट संचालक संजय पानसरे यांनी सांगितले. त्यातच आता रमजान सुरू झाला असल्यानेही याचा हापूस आंबाला फायदा मिळत आहे. दुसरीकडे सरकारने निर्यात सुरू केली असल्यामुळे परदेशात हापूसची निर्यात होताना दिसत आहे. युरोप आणि अमेरिकेमध्ये कोरोनाने कहर केला असल्याने या देशात हापूस आंब्याची वारी अजून सुरू झालेली नाही.