(Source: ECI/ABP News/ABP Majha)
coronavirus | 11 ते 17 मे या कालावधीत नवी मुंबई एपीएमसी भाजी मार्केट बंद
कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने कम्युनिटी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या बैठकीनंतर एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई : जीवनावश्यक गोष्टींची कमतरता मुंबईला पडू नये यासाठी वाशी येथील एपीएमसी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि माथाडी कामगारांनी घेतला होता. मात्र कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने कम्युनिटी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या बैठकीनंतर एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. भाजी , फळ, कांदा बटाटा, मसाला, दाना मार्केट 11 ते 17 मे पर्यंत बंद करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत.
एपीएमसीत आतापर्यंत 50 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं ही खबरदारी घेण्यात येणार आहे. दरम्यान मार्केट बंद राहिल्यानं मुंबईत येणाऱ्या मालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 11 ते 17 मे या कालावधीत माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. कोकण आयुक्त, नवी मुंबई मनपा आयुक्त, पोलिस, माथाडी कामगार, व्यापाऱ्यांची आज बैठक पार पडली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
एपीएमसीमुळे 130 ते 140 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली आहे. एपीएमसी मधील रुग्ण वाढीमुळे नवी मुंबईकरांची चिंता वाढली असून यासाठी सर्व स्थरातून रोष व्यक्त होत आहे. भाजपा आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्रव्यवहार करून एपीएमसी मुळे कम्युनिटी संसर्ग पसरण्याची भिती असल्याने त्वरीत बंद करण्याची मागणी केली होती. एक आठवडा मार्केट बंद केल्यानंतर या दरम्यान कामगार , व्यापारी, ट्रान्सपोर्टर अशा 18 ते 20 हजार जणांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यात ज्यांना लक्षणे आढळतील त्यांना मार्केट मध्ये प्रवेश बंदी केली जाणार असून त्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.
Coronavirus | मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढती, केंद्राचं पथक प्रत्येक आठवड्याला मुंबईत येणार