Mumbai Jain Temple: विलेपार्लेमधील जैन मंदिरावर महापालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक; मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी आंदोलनस्थळी दाखल
Mumbai Jain Temple: मुंबईतील विलेपार्ले पूर्व मधील कांबळीवाडी येथील 30 वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली.

Mumbai Jain Temple मुंबई: मुंबईतील विलेपार्ले पूर्व मधील कांबळीवाडी येथील 30 वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर (Vile Parle Jain Temple) मुंबई महापालिकेने (Mumbai Muncipal Corporation) तोडक कारवाई केली. हायकोर्टाच्या आदेशाने मुंबई महानगरपालिका के/पूर्व विभागाकडून जैन मंदिरावर 16 एप्रिल रोजी तोडक कारवाई करण्यात आली होती. महानगर पालिकेच्या या कारवाई विरोधात जैन समाज आक्रमक झाला आहे. आज (19 एप्रिल) जैन समाजाच्या महिला आणि पुरुष मंदिरा बाहेर आंदोलन करत आहेत. विलेपार्ले मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी हेसुद्धा आंदोलनस्थळी दाखल झालेत. तसेच मंत्री आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी देखील आंदोलनस्थळी भेट दिली.
मुंबई महानगरपालिका विरोधात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाचा उपस्थितीमध्ये विलेपार्ले ते अंधेरी पूर्व परिसरात पालिकेच्या के/पूर्व कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तसेच पालिका के/पूर्व विभागाचे वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची विनंती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जैन समाजाकडून करण्यात आली आहे.
जैन समाज आक्रमक-
जैन मंदिरावर तोडक कारवाई दरम्यान जैन धर्मियांच्या धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्तावर फेकण्याचा आरोप करण्यात येत आहे. धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू काढून द्यावी, जैन धर्मियांच्या विनंतीला मान न देता पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने केली तोडक कारवाई केल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या ठिकाणी जैन मंदिर होते, त्या ठिकाणी ते पुन्हा बांधून देण्याची मागणी जैन धर्मियांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हायकोर्टाकडून जैन मंदिर तोडक कारवाईवर स्टे देण्यात आला आहे.
आमची अशी अनेक मंदिरं तोडली-
आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही एवढाच सांगतो की, यापुढे अशा मंदिरांवर कारवाई होत असेल तर आपण यामध्ये लक्ष घालावे. आमची अशी अनेक मंदिरं तोडली आहेत. एका हॉटेलवाल्याने आमच्यावर कारवाई केली. यामध्ये अनेक मोठे राजकारणी देखील शामिल आहेत. त्यामुळे आता संपूर्ण जैन समाज महाराष्ट्रभर एकवटला आहे, असं आंदोलनावेळी उपस्थित असणाऱ्या जैन धर्मगुरूंनी सांगितले.























