Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Gateway Boat Accident to Elephanta Cave ferry boat Accident: एलिफंटा बघायला आलेल्या परदेशी जोडप्याने वाचवले प्राण, सात ते आठ प्रवाशांचा जीव वाचला.
मुंबई: गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटा येथे जाणारी प्रवाशी बोट बुधवारी दुपारी समुद्रात बुडाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 90 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. यापैकी चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशांनी अंगावर काटा आणणारे अनुभव सांगितले. मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात राहणाऱ्या वैशील अडकणे या आपल्या 14 महिन्यांचा मुलगा आणि कुटुंबीयांसह एलिफंटा लेणी पाहण्यासाठी गेल्या होत्या. बोट बुडायला लागल्यानंतर वैशाली यांच्या भावाने त्यांच्या लहान मुलाला आधी हातावर उचलून धरले आणि नंतर खांद्यावर बसवले. त्यामुळे इतर बोटी येईपर्यंत हे लहान बाळ आणि त्याचे कुटुंबीय तग धरु शकले.
वैशाली अडकणे यांनी या सगळ्या प्रकाराविषयी माहिती देताना सांगितले की, आम्ही कुटुंबातील आठजण सुट्टी असल्यामुळे एलिफंटाला फिरायला चाललो होतो. आम्ही बोटीत बसून 40 ते 50 मिनिटं झाली असतील तेव्हा एक पांढऱ्या रंगाची स्पीडबोट अत्यंत वेगाने येऊन आमच्या बोटीला धडकली. त्या धक्क्याने आम्ही जागेवरच पडलो. त्यावेळी स्पीडबोटमधील एकजण उडून आमच्या बोटीवर पडला होता. तो जवळपास मेला होता. स्पीडबोटमधील दुसरा व्यक्तीनेही जवळपास जीव सोडला होता. सुरुवातीला आम्हाला वाटले काही झाले नाही. मात्र, स्पीडबोटने टक्कर दिल्याने आमच्या बोटीला भोक पडल्याचे काहीवेळाने लक्षात आले. तेव्हा आमच्या बोटीचा ड्रायव्हर लाईफ जॅकेट घाला, असे ओरडायला लागला. माझ्या भावाने आम्हा सगळ्यांना लाईफ जॅकेट दिले ते आम्ही घातले. त्यानंतर बोट एका बाजूला कलंडली आणि हळूहळू बुडत गेली. काहीजण बोटीखाली सापडले तर काहीजण वाहत गेले.
आम्हीही जगण्याची आशा जवळपास सोडली होती. मात्र, लाईफ जॅकेटमुळे आम्ही वाचलो. ज्यांचे लाईफ जॅकेट फ्लोमुळे उडाले ते लगेच बुडाले. आम्ही बोटीला धरुन कसेबसे तरंगत होतो. मला काही करुन माझा 14 महिन्यांचा मुलगा शर्विलला वाचवायचे होते. सुरुवातीला माझ्या भावाने त्याला एका हाताने पाण्याच्या वर उचलून धरले होते. त्यानंतर माझ्या भावाने त्याला खांद्यावर बसवले आणि बोटीचा आधार घेऊन तरंगत राहिला. जवळपास अर्धा तास कोणीही आमच्या मदतीला आले नाही. त्यानंतर सुदैवाने दोन-तीन बोटी आल्या आणि त्यांनी आम्हाला वाचवले. आणखी पाच-दहा मिनिटं वेळ झाला असता तर आम्ही सगळे बुडालो असतो, असे वैशाली अडकणे यांनी सांगितले.
परदेशी दाम्पत्याने अनेकांना वाचवले
वैशाली अडकवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पीडबोटच्या धडकेनंतर नीलकमल बोट बुडाली तेव्हा एका परदेशी दाम्पत्याने अनेक प्रवाशांचे जीव वाचवले. या परदेशी दाम्पत्याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सात-आठ जणांना वाचवले आणि त्यांना मदतीला आलेल्या बोटींमध्ये चढवले, असे वैशील अडकणे यांनी सांगितले.
आणखी वाचा