Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी टोकाचा निर्णय घेतला, उद्यापासून पाणी पिणं बंद करणार, मराठा आंदोलनाची धग वाढणार
Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे. आता मनोज जरांगेंनी टोकाचा निर्णय घेतलाय.

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे मुंबईच्या आझाद मैदानवर तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या उपोषणासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 70 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण असून ते दिलं गेलं नाही. आरक्षणाची लेकरांची वेदना आहे. गरीब लोक हे मुंबईला आले आहेत. सगळ्या जातींचे लोक गोरगरीब मराठा समाजाची सेवा करत आहेत. राज्यातील गोरगरीब मराठा जर मुंबईत येत असतील तर आपली गाडी ग्राउंडला लावा आणि रेल्वेने आझाद मैदानला या.
तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील, असे आवाहन त्यांनी मराठ्यांना केले आहे.
महाराष्ट्राच्या मराठ्यांनी कोणालाही पैसा द्यायचा नाही
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही जेवण घेऊन मुंबईत येत असाल तर तुम्ही जिथे-जिथे पार्किंग आहेत तिथे वाटप करत येथे या. नाहीतर तिकडचे उपाशी राहतील. अन्नछत्र ज्यांनी सुरु केलं त्यातून पैसे मागू नका. गरिबांचं रक्त पिऊ नका. मी डायरेक मिडीयात नावं घेईल. मी कोणाला बोलतोय हे त्याला कळतंय. तू लोकसभेत सुद्धा पैसे लोकांकडून घेतले. तुझे डिझेल खर्च झाले त्याचा हिशोब करतो आणि तुझे पैसे देतो. तू रेनकोट वाटले आणि कोणाकडून पैसे घेतले हे माहित आहे. दादा असशील का पादा असशील. महाराष्ट्राच्या मराठ्यांनी कोणालाही पैसा द्यायचा नाही, असे देखील त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. तर उद्यापासून पाणी पिणं बंद करणार आहे, अशी घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
उद्यापासून पाणी पिणं बंद करणार
मी काल आणि आज पाणी पिलो आहे. उद्यापासून पाणी पिणे मी बंद करणार आहे. सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही. त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. उद्यापासून आमरण उपोषण कडक सुरू करणार आहे. उद्यापासून पाणीसुद्धा बंद करणार आहे, असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलाय.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
























