सोमय्यांच्या पत्नीने अब्रुनुकसानीचा खटला जिंकला, संजय राऊत दोषी असल्याचा निकाल, 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा
Sanjay Raut: शिवडी न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे
मुंबई : महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे खणून काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आला आहे. 25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने निकाल दिला आहे. 2022 सालचे हे प्रकरण आहे. मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यांवर आरोप केला होता.
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मीरा भाईंदर येथील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 15 दिवसाची कैद असल्याने संजय राऊत जामीनास पात्र आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल. ते स्वत:ला सरेंडर करतील. त्यानंतर कोर्ट त्यांना जामीन मंजूर करण्याची शक्यता आहे. सुनावणीवेळी संजय राऊत कोर्टात उपस्थित नव्हते. परंतु कोर्टाने आपल्या नियोजीत वेळेत निकालाचे वाचन पूर्ण केले आहे.
कोर्टाच्या निकालानंतर मेधा सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं की, आजही भारतातील न्यायव्यवस्था रामशास्त्री प्रभुणे यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. माझ्या कुटुंबावर , माझ्या मुलावर कोणी आँच आणायचा प्रयत्न केला तरी एक सामान्य गृहिणी कशी लढेल, तशीच मी लढले. मला न्यायालयाने योग्य तो न्याय दिला आहे. मी समाजसेवा करते आणि शिक्षणही देते, या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला, असे वाटते. मी न्यायालयाच्या निकालावर समाधानी आहे. शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारची बेताल वक्तव्ये करण्याला यामुळे चाप बसेल, अशी प्रतिक्रिया मेधा सोमय्या यांनी व्यक्त केली.
काय आहे प्रकरण?
मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. मात्र संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. संजय राऊत यांना यापूर्वीच मानहानी, बदनामीची नोटीस दिली आहे, मुलुंड पोलिस स्टेशन येथे तक्रार ही दाखल केली आहे. एक रुपयाचा घोटाळा झालेला नसताना, एक रुपयाचा घोटाळाचे पुरावे/ कागदपत्र नसताना संजय राऊत यांनी फक्त भीतीसाठी, बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
हे ही वाचा :