मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनचे काम सुरु असलेल्या परिसरात आज दुपारी 1 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास आग लागली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे कार्य सुरू आहे.
मुंबई : राजधानी मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची माहिती असून आगीची वृत्त समजताच प्रशासनाकडून सर्व मेट्रो ऑपरेशन थांबवण्यात आले आहेत. त्यानंतर, मेट्रो (Metro) स्टेशनमधील सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बीकेसी मेट्रो स्टेशन हे अंडरग्राउंड स्टेशन असून पहिल्यांदाच या ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र, वेळीच सावधगिरी बाळगल्याने मोठा अनर्थ टळला.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनचे काम सुरु असलेल्या परिसरात आज दुपारी 1 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास आग लागली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे कार्य सुरू आहे. सुमारे 40 ते 50 फूट खोल तळघरातील लाकडी साठा आणि फर्निचर असलेल्या ठिकाणी ही आग पसरली होती. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम कार्यरत असून सर्वच प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान, या आगीच्या घटनेमुळे स्टेशनबाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली असून अग्निशमन दलाच्या 10 ते 12 घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. बीकेसी मेट्रो स्टेशन जमिनीच्या खाली असल्याने आग पसरली असती तर वित्तहानी होण्याचा मोठा धोका होता. लाकडाच्या साठ्याला आग लागल्यानंतर धुराचे प्रचंड लोट मेट्रो स्थानकाच्या परिसरात पसरले. त्यावेळी सर्व प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. ही आग विझवण्यसाठी घटनास्थळी अग्निशामन दलाच्या 12 ते 13 गाड्या दाखल झाल्याने याठिकाणी रस्ते वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. सध्या ही आग आटोक्यात आणल्याची माहिती असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
आग आटोक्यात, मेट्रोकडून निवेदन
दरम्यान, मेट्रो प्रशासनाने आग आटोक्यात आल्याची माहिती दिली आहे. मुंबई मेट्रोने यासबंधित एक निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यामध्ये म्हटलंय की, "मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MMRC) कडून कळविण्यात येते की, आज, 15 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी अंदाजे 1.00 वाजता बीकेसी मेट्रो स्थानकाच्या अद्याप कार्यान्वित नसलेल्या A4 प्रवेश/निकास द्वारा बाहेर आग लागली. या प्रवेश द्वारा जवळ सध्या कामे सुरू असून हे सध्या प्रवाशांसाठी खुले करण्यात आलेले नाही. या आगीमुळे काही भागात धूर पसरला. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बीकेसी स्थानकावरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली होती. मात्र, आरे-जोगेश्वरी- वांद्रे कॉलनी दरम्यानची इतर मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे सुरू होती. मुंबई अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली असून एमएमआरसी आणि डीएमआरसीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. फायर ब्रिगेडने आग पूर्णपणे विझवल्यानंतर आणि दुपारी 2.45 वाजता त्यांची परवानगी मिळाल्यानंतर बीकेसी स्थानकावरील सेवा पूर्ववत करण्यात आल्या. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
हेही वाचा
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी जबरा पलटवार