Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलं
Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलं
देवेंद्र फडणवीस यांना 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेबाबत काय वाटतं ते मला माहिती नाही. मात्र, मला 'बटेंगे तो कटेंगे' ला विरोध असल्याचे रोखठोक मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. 'बटेंगे तो कटेंगे'ला आम्ही सगळ्यांनी विरोध केला आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडे, महाजन यांनीही 'बटेंगे तो कटेंगे'ला (Batenge to Katenge) विरोध केल्याचे माझ्या कानावर आले. एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात आणि 'बटेंगे तो कटेंगे'बोलतात. आम्ही लगेच त्याला विरोध केला. आम्ही सांगितले की, हा उत्तर प्रदेश नाही. हे उत्तरेत चालत असेल. पण आमच्या महाराष्ट्रात शिव-शाहू-आंबेडकरांची विचारधारा चालते. मी जेव्हापासून राजकारणात आलोय तेव्हापासून पाहतोय महाराष्ट्र दुसरी कोणतीही विचारधारा स्वीकारत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. ते शुक्रवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
या मुलाखतीमध्ये अजित पवार यांना 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेबाबात देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत विचारण्यात आले. फडणवीस म्हणतात की, हे ऐतिहासिक सत्य आहे. जेव्हा हिंदू एकत्र राहत नाहीत, तेव्हा त्यांची लोकसंख्या कमी होते. त्यांच्याविरोधातील हिंसा वाढते, असे फडणवीसांनी म्हटल्याकडे अजित पवारांचे लक्ष वेधण्यात आले. यावर अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटले की, आपण वेगवेगळ्या लोकांना मुलाखत देतो, तिकडे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. यावर देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर काय आहे, हे मला माहिती नाही. पण मी तुम्हाला माझं उत्तर दिलंय की, 'बटेंगे तो कटेंगे' हे मला पसंत नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.