Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तासगावचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तासगावचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आल्या आहेत. या राज्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचं याचा निकाल घेण्याची निवडणूक आहे. आठ दहा महिन्यांपूर्वी देशाची निवडणूक झाली. त्या देशाचा कारभार हाती घ्यायचा हे सूत्र घेऊन नरेंद्र मोदी देशात फिरत होते. ते जाईल त्या ठिकाणी सांगत होते मला चारशे जागा द्या. लोकसभेचं काम चालवायचं असेल, सरकारचं काम चालवायचं असेल तर पावणे तीनशे जागा असतील तर काम सहज करता येतं, असं शरद पवार म्हणाले.
नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मी संरक्षण मंत्री होतो. त्या सरकारमध्ये आमच्याकडे 250 पेक्षा कमी खासदार संख्या होती. तरी सुद्धा 5 वर्ष राज्य चालवलं. लोकांचे प्रश्न सोडले त्यासाठी चारशे जागांची गरज नव्हती. मोदी साहेब चारशे पार का सांगतात याबाबत शंका मनात होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्यात बदल करायचे असतील तर त्याला मोठी संख्या आवश्यक असते. आजचे राज्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार असल्यानं त्यांच्याकडून चारशे जागांची मांडणी केली जात होती. त्यामुळं आम्ही सर्वांनी एकत्र बसून निकाल घेतला. देशात काही झालं तरी चालेल 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल आम्ही घेतला. राज्य त्यांचं आलं पण घटनेत बदल करायची ताकद त्यांची राहिली नाही, असं शरद पवार म्हणाले.
माणसं विकत घेण्याचा प्रयत्न : शरद पवार
आम्ही काँग्रेसला बरोबर घेतलं, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत. आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्राचं राजकारण काही झालं तरी देवेंद्र फडणवीस आणि घटक आहेत त्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही, यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असं शरद पवार म्हणाले. आम्ही कामासाठी मतं मागत आहोत. आम्ही कार्यक्रम आखला आहे, त्यासाठी मतदान करण्याचं आवाहन करत आहोत. आज ज्यांच्या हातात राज्य आहे, ते पैशाचा गैरवापर, दुसरं निवडणुकीत काही नाही. निवडणुकीत पैसे पैसे, पैसे, पैसे टाकायचे, माणसं विकत घ्यायचा प्रयत्न करायचा आणि निवडणूक जिंकायचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. काही कार्यक्रम त्यांनी घेतले पण त्यात सत्यता किती हे तपासण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी म्हटलं.
महिलांवरील अत्याचार थांबवण्याचं काम राज्यकर्ते करत नाहीत : शरद पवार
शरद पवार पुढं म्हणाले, लाडक्या बहिणींना पैसे दिले तर त्यात तक्रार नाही. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. युती सरकारच्या काळात महाराष्ट्रात स्त्रिया सुरक्षित आहेत हे म्हणण्याची स्थिती नाही. युतीच्या काळात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली. दोन वर्षाच्या काळात 67381 महिलांवर अत्याचार झाले. याचा अर्थ महाराष्ट्रात दर तासाला 5 महिलांवर अत्याचार केले जातात. दुर्दैवानं आज या राज्यातील मुली आणि स्त्रिया गायब झाल्या त्यांचा आकडा 6 हजारांच्या आसपास आहेत. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आजचे राज्यकर्ते काही करत नाहीत, असं शरद पवार म्हणाले.
रोहित काही काळजी करु नका
या राज्यात तरुण पिढीचे प्रश्न आहेत. आज मी या सभेत पाहतोय, रोहित सारख्या तरुणाला संधी द्यायचा निर्णय तुम्ही घेतलाय, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज आहे, असं मला वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले. ही तरुण पिढी खऱ्या अर्थानं शक्तिशाली केली पाहिजे. महाराष्ट्र तरुणांनी चालवला पाहिजे. रोहितनं सांगितलं मला एकटं पाडण्याचं प्रयत्न करतायत. काही काळजी करु नका कोण एकटं पाडू शकत नाही. दोन तालुक्याची तरुण पिढी, कवठे महांकाळची असेल, ती तासगावची असेल, ही तरुणांची शक्ती तुमच्या मागं आहे तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं. तुम्ही आज हे म्हणताय 55 वर्षापूर्वी माझी अवस्था तिच होती. वयाच्या 26 व्या वर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता. माझ्या विरुद्ध आमच्याकडचे सर्व नेते होते. विरोधक खूप असूनही यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी ऐकलं नाही,असं शरद पवार म्हणाले.
इतर बातम्या :