Mumbai Local : लोकलची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे सक्रिय, मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी आखली मोहीम
Mumbai Local : मुंबई लोकल मधील पिकअवर आणि रशअवरमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतील सरकारी आणि खाजगी कार्यालयांनी आपल्या कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी मध्य रेल्वेने एक मोहीम सुरू केली आहे.
मुंबई : मुंबई लोकल (Mumbai) मधील पिकअवर आणि रश अवरमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतील सरकारी (Government) आणि खाजगी (Private) कार्यालयांनी आपल्या कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी मध्य रेल्वेने एक मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून रविवार 17 डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या शहरातील सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन त्याद्वारे पुन्हा एकदा सर्वांना कार्यालयीन वेळा बदलण्याची आवाहन मध्य रेल्वेने (Central Railway) केले.
मुंबईत दररोज लोकल मधील गर्दीमुळे किमान पाच ते दहा प्रवासी आपला जीव गमावतात. यासाठीच गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या लोकल प्रवाशांचा पॅटर्न समजून घेऊन त्याद्वारे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुचवण्यात आल्या. मात्र या सर्व उपाययोजनांमधील अतिशय सोपी सरळ आणि कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता अमलात येऊ शकणारी उपाययोजना म्हणजे सरकारी आणि खाजगी कार्यालयांनी आपल्या कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट मध्ये कराव्यात. जेणेकरून सकाळी आठ किंवा नऊ वाजता अर्धे कर्मचारी आणि त्यानंतर अकरा किंवा बारा वाजता अर्धे कर्मचारी कार्यालयात येतील.
दोन शिफ्टमध्ये कर्माचाऱ्यांना विभागले
स्वतः मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दोन शिफ्टमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना विभागले आहे. यशस्वीरित्या असे केल्यानंतर मुंबईचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी मुंबईतील 350 केंद्रीय तसेच राज्य सरकारच्या आणि खाजगी संस्थांना पत्र लिहून कार्यालयीन वेळा दोन शिफ्टमध्ये बदलण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला आतापर्यंत सहा संस्थांनी प्रतिसाद दिला असून कार्यालयीन वेळा विभागण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात एक जाहिरात आज मध्य रेल्वेने सर्व वृत्तपत्रांमध्ये दिली आहे.
कोणकोणत्या संस्थांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
1) Postal department, Post master general, Mumbai
2) All India Association of Industry
3) Bajaj electrical limited
4) IRB infrastructure developers limited
5) Bombay Stock exchange
6) Bhabha atomic research centre (BARC)
मुंबईत पीक आणि रश अवर कोणते?
सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 हे मुंबईतील लोकल मधील सर्वात गर्दीचे तास आहेत. या पीकअवर दरम्यान प्रत्येक 3 ते 4 मिनिटाला 1 अश्या 18 लोकल एका तासात धावतात. गेल्या 7 वर्षात 150 नवीन लोकल फेऱ्या वेळापत्रक समाविष्ट करण्यात आल्या. आता रेल्वे प्रशासनाची क्षमता संपली. 1956 साली मुंबई लोकल मधील गर्दी कमी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने देखील मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलाव्या अशी सूचना दिली होती.
त्यानंतर माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देखील मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद आजतागायत मिळालेला नाही. त्यामुळे निदान राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जरी आपल्या संस्थांच्या कार्यालयीन वेळा बदलल्या तरी मुंबई लोकलमधील अर्ध्यापेक्षा जास्त गर्दी कमी होईल. अखेर मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे.