कोकणातील प्रकल्प पळवण्याच्या विनायक राऊतांच्या आरोपांवर अमित देशमुख म्हणतात...
कोकणाला मंजूर झालेला आयुष मंत्रालयाचा प्रकल्प अमित देशमुख लातूरला पळवून नेत आहेत, अशी टीका विनायक राऊत यांनी केली. त्यावर अमित देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोकणातील प्रकल्प मराठवाड्याला नेण्याचा प्रयत्नही नाही, असं ते म्हणाले.
मुंबई : आयुष मंत्रालयाचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट या प्रकल्पावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी थेट राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली. मात्र प्रशासकीय बाबीत भावनाविवश होऊन भाष्य करणं आवश्यक नाही, चर्चेने हा प्रश्न सोडवू शकतो, असं उत्तर अमित देशमुख यांनी दिलं. या प्रकल्पासाठी आधी जळगावची जागा निश्चित झाली होती. पण ती जागा योग्य नसल्याने इतर जागांबाबत विचार सुरु आहे. त्यामुळे कोणीही प्रकल्प पळवलेला नाही, असं स्पष्टीकरण अमित देशमुख यांनी दिलं.
तसंच उदय सामंत यांना नेहमी भेटतो, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. कोणीही प्रस्ताव पाठवला तर तो केंद्रला जाणार आणि ते निर्णय घेणार, असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं.
कोकणातला प्रकल्प लातूरला हलवा, अमित देशमुखांच्या मागणीवर विनायक राऊत भडकले!
'कोकणातील प्रकल्प मराठवाड्याला नेण्याचा प्रयत्नही नाही' कोकणाला मंजूर झालेला आयुष मंत्रालयाचा प्रकल्प अमित देशमुख लातूरला पळवून नेत आहेत, अशी टीका विनायक राऊत यांनी केली. त्यावर अमित देशमुख म्हणाले की, "शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कोकणातील प्रकल्प मराठवाड्याला नेण्याचा प्रयत्नही नाही. महाराष्ट्रात एक राष्ट्रीय संस्था असावी, अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. आयुष मंत्रालयाने जळगावमध्ये ही संस्था उभी करण्याचा निर्णय घेतला होता. पण जळगावमधील जागा योग्य नाही, असं आयुष्य मंत्रालयाने कळवलं होतं. त्यानंतर कोणत्या जागेचा पर्याय देता येईल, अशी चर्चा सुरु झाल्यावर त्या संस्थेसाठी हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पाठवला आहे. त्यावर केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. सिंधुदुर्गासाठी हर्बल गार्डन्सचा प्रकल्प मंजूर झाला होता. याआधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा ही संस्थाही सुरु करण्याबाबत पत्रव्यवहार झाला होता अशी माहिती आहे. सध्या चर्चा असलेला प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये होणार आहे किंवा होणार होता अशी कोणतीही बाब वैद्यकीय शिक्षण विभागासमोर नव्हती. त्यामुळे याच्या खोलात जाऊन वस्तुस्थिती काय आहे हे पाहायला हवं. त्यानंतर त्यावर भाष्य केलं पाहिजे. खासदार विनायत राऊत यांचं काय मत आहे, त्यांचे काय विचार आहेत हे आम्ही समजून घेऊ, त्यानंतर त्यावर मार्ग निघेल. अशा प्रशासकीय बाबीत भावनाविवश होऊन भाष्य करणं आवश्यक नाही, चर्चेने हा प्रश्न सोडवू शकतो."
विनायक राऊत काय म्हणाले होते? "केंद्र सरकारचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प दोडा मार्गमधील आढाळी भागात उभारण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाकडून कोकणाला यासाठी मंजुरी मिळाली आहे, यासंदर्भात अभिप्राय मागवला असताना अचानक हा प्रकल्प लातूरला हलवला अशी मागणी अमित देशमुख यांनी केली. सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत. हा प्रकल्प कोकणातच होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही. आतापर्यंत कोकणाला न्याय मिळत नव्हता. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाला बदलत आहेत. जर हा प्रकल्प कोण पळवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो हाणून पाडू," अशा शब्दात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हल्लाबोल केला होता.