(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोकणातला प्रकल्प लातूरला हलवा, अमित देशमुखांच्या मागणीवर विनायक राऊत भडकले!
कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे. हा प्रकल्प कोण पळवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो हाणून पाडू, असं राऊत म्हणाले.
मुंबई : कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे. तसंच महाविकास आघाडीत प्रकल्प पळवापळवी होऊ नये यासाठी वरिष्ठांनी मध्यस्थी करावी जेणेकरुन समन्वय राहिल, असंही विनायक राऊत म्हणाले. परंतु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांटवरुन ठाकरे सरकारमधील असमन्वय पुन्हा एकदा समोर आला आहे.
केंद्र सरकारचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प दोडा मार्गमधील आढाळी भागात उभारण्यात येणार आहे. "आयुष मंत्रालयाकडून कोकणाला यासाठी मंजुरी मिळाली आहे, यासंदर्भात अभिप्राय मागवला असताना अचानक हा प्रकल्प लातूरला हलवा, अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांनी केली. सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत," अशा शब्दात विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला.
'...तर तो प्रयत्न हाणून पाडू' विनायक राऊत पुढे म्हणाले की, "हा प्रकल्प कोकणातच होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही. आतापर्यंत कोकणाला न्याय मिळत नव्हता. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाला बदलत आहेत. जर हा प्रकल्प कोण पळवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो हाणून पाडू."
अमित देशमुखांनी विलासरावांचे गुण घेतले पाहिजे : विनायक राऊत खासदार राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर टीकेचे बाण सोडले, तसंच अमित देशमुखांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही असाही आरोप केला. "अमित देशमुख यांनी केलेला हा प्रकार निंदनीय आहे. स्वर्गीय विलासराव असते तर अशा घटना घडल्या नसत्या. त्यांचं प्रेम वेगळं होतं, पण अमित देशमुखांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिली नाही. पत्रव्यवहार केले पण उत्तरं दिली नाहीत. पालकमंत्री उदय सामंत यांनाही त्यांनी भेट नाकारली. हे अशोभनीय आहे. अमित देशमुखांनी विलासरावांचे गुण घेतले पाहिजे, असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी केला.